कर्जमाफीचे 175 कोटी 78 लक्ष रुपये सीडीसीसी बँकेला प्राप्त
23 हजार 508 शेतक-यांचा समावेश ; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2 जून 2026 च्या शासन निर्णयाद्वारे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना -2026’ सुरू केली आहे. या योजनेसाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (सीडीसीसी) 36 हजार 757 पात्र शेतक-यांची यादी प्राप्त झाली होती. त्यापैकी शुक्रवारी (दि.7) सीडीसीसी बँकेच्या 23 हजार 508 शेतक-यांच्या कर्जमाफीचे 175 कोटी 78 लक्ष 55 हजार 144 रुपये बँकेला प्राप्त झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहिल्या टप्प्यात राज्यातील 6 कोटी 22 लक्ष पात्र शेतक-यांच्या कर्जमाफीची 5 हजार 29 कोटी रुपयांची रक्कम बँकांना वितरीत केली. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सीडीसीसी बँकेच्या 23 हजार 508 शेतक-यांचा समावेश आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना, चालू खरीप हंगामात शेती कामांसाठी आर्थिक अडचण भासू नये, यासाठी तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आवश्यक आर्थिक बळ मिळणार आहे.
विशेष म्हणजे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रक्रिया डिजीटल आणि पारदर्शक पध्दतीने करण्यात येत आहे. शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत आवश्यक अटी व प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असल्याने शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण, ॲग्रीस्टॅक नोंदणी तात्काळ करून करावी. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळील सहकारी संस्था, आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) किंवा सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
ऑफलाईन सुध्दा करता येणार तक्रार: ऑनलाईन तक्रार होत नसल्यास, संबंधित तालुक्याचे सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे शेतकरी लेखी स्वरुपात ऑफलाईन तक्रार दाखल करू शकतात, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जयसिंग ठाकूर यांनी कळविले आहे.



