ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहर महानगरपालिकेत स्थिर व सक्षम प्रशासनासाठी आयएएस दर्जाच्या आयुक्तांची नियुक्ती करा

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे माजी उपमहापौर राहुल पावडे यांची पत्राद्वारे मागणी

चांदा ब्लास्ट

आ. मुनगंटीवार यांचे शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन

 शहर महानगरपालिकेत सध्या कार्यरत आयुक्त हे केवळ चार्जवर असून पूर्णवेळ आयुक्त नसल्याने महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर तसेच शहरातील विकास प्रक्रियेवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर महानगरपालिकेत तात्काळ पूर्णवेळ आयुक्त म्हणून आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी पत्राद्वारे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

व्यापक क्षेत्रफळ, वाढते प्रशासनिक दायित्व आणि निवडणुका न झाल्यामुळे निर्माण झालेल्या स्थगित परिस्थितीमुळे अनेक नागरिकाभिमुख सुविधा व विकासकामांना गती मिळत नाही. शहराची लोकसंख्या आणि प्रशासकीय गरजा लक्षात घेता अनुभवी आयएएस अधिकारी असणे अत्यावश्यक आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर स्वनियंत्रण राहील, निर्णयप्रक्रियेला वेग येईल आणि प्रलंबित विकासकामांना गती मिळेल. सध्या निवडणुका न झाल्यामुळे शहरातील अनेक प्रकल्प, मूलभूत सुविधा व विकास आराखडे अर्धवट स्थितीत आहेत. नागरिकांना रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचेही माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी निदर्शनास आणले.

चंद्रपूरसारख्या महत्त्वाच्या शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर पूर्णवेळ आयुक्त नेमणे आवश्यक असून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी आ. मुनगंटीवार यांच्याकडे व्यक्त केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये