ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रम्हपुरीत राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचा भव्य शुभारंभ

विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते उद्घाटन 

चांदा ब्लास्ट

क्रीडा क्षेत्रातूनच सक्षम, शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण पिढी घडते, या विश्वासाला बळ देणाऱ्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा आज ब्रम्हपुरी येथे पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन विधिमंडळ पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते उत्साहात व जल्लोषात करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी बोलतांना आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, “हॉकीसारखा राष्ट्रीय खेळ ग्रामीण भागात पोहोचणे ही अभिमानाची बाब आहे. अशा स्पर्धांमुळे खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते. ब्रम्हपुरीसारख्या तालुक्यातून भविष्यात देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू घडावेत, हीच अपेक्षा आहे.”

या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या नामांकित संघांनी सहभाग घेतला असून, पहिल्याच दिवशी रंगतदार सामने पाहायला मिळाले. खेळाडूंच्या कौशल्यपूर्ण खेळाने आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संपूर्ण क्रीडांगण उत्साहाने भारावून गेले होते.

आ. वडेट्टीवार पुढे म्हणाले की, “क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, मैदानांचे विकासकाम आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू. खेळाडूंनी शिक्षणासोबत खेळालाही तितकेच महत्त्व द्यावे.”

कार्यक्रमाचे उद्घाटन विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थानी ने.ही.महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.कोकोडे होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष योगेश मिसार, न.प.उपाध्यक्ष डॉ.नितीन उराडे, ज्येष्ठ नेते डॉ. देविदास जगनाडे, मुख्याधिकारी डॉ.माधूरी सलामे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, आंतरराष्ट्रीय हाॅकी खेळाडू, काॅनराय रेमोडीओस, प्राचार्य डॉ.संजय सिंग, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोनू नाकतोडे, नगरसेवक सचिन राऊत, नगरसेवक मनोज कावळे, नगरसेवक मोंटु पिलारे, नगरसेवक प्रकाश खोब्रागडे, नगरसेवक राकेश पडोळे, नगरसेवक चंद्रकांत बावनकुळे, नगरसेवक पुष्पाकर बांगरे, नगरसेवक वकार खान, नगरसेविका बबीता आमले, नगरसेविका काजल तलमले, नगरसेविका रेणुका ठेंगरी, नगरसेविका जयश्री कुथे, नगरसेविका रंजना पीसे, नगरसेविका हेमलता सिंहगडे, नगरसेविका गीता मेश्राम, नगरसेविका पुष्पलता पोपटे, नगरसेविका सपना बल्लारपुरे, नगरसेविका ज्योती राऊत, नगरसेविका माधुरी उपासे, नगरसेविका रंजना बुराडे यांसह अन्य मान्यवर, क्रीडा संघटक, प्रशिक्षक, पंच तसेच मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते. हकार्यक्रमाच्या शेवटी खेळाडूंना शुभेच्छा देत स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे आ. वडेट्टीवार यांनी कौतुक केले.

ही राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा ब्रम्हपुरीच्या क्रीडा क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार असून, नवोदित खेळाडूंना नवे व्यासपीठ देणारी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये