चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी IAS अधिकाऱ्याची नियुक्ती _ खा. धानोरकर यांच्या मागणीला यश
प्रभावी नेतृत्वाची मागणी मान्य: चंद्रपूर शहराच्या विकासाला मिळणार 'IAS'ची दूरदृष्टी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ शहर महानगरपालिकेच्या प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि शहराच्या नियोजित विकासाला योग्य दिशा देण्यासाठी, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेली महापालिका आयुक्त पदावर भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाने मान्य केली आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार,अकनुरी नरेश, भाप्रसे यांची महापालिका आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पत्राद्वारे ही मागणी केली होती. त्यांनी आपल्या पत्रात चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील प्रशासनात शिस्तीचा अभाव आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असल्याचे नमूद केले होते. तसेच, विकासकामांना गती मिळत नसून, निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आहे आणि कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा तसेच रस्ते यांसारख्या मूलभूत गरजांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. या परिस्थितीत नियंत्रण मिळवण्यासाठी आणि शहराचा विकास साधण्यासाठी, एक कर्तव्यदक्ष आणि सक्षम IAS अधिकारी नियुक्त करणे अत्यंत आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली होती.
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या लोकहिताच्या मागणीचा विचार करून, शासनाने त्वरित कार्यवाही केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने अकनुरी नरेश यांची नियुक्ती विद्यमान प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड यांच्या जागी केली आहे. यापूर्वी अकनुरी नरेश हे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण आणि सहायक जिल्हाधिकारी, कळवण उप विभाग, नाशिक येथे कार्यरत होते.
या नियुक्तीमुळे चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या प्रशासनात सुधारणा होऊन भ्रष्टाचार नियंत्रणात येऊन पारदर्शकता वाढेल आणि शहराच्या विकासाला योग्य व दूरदृष्टीची दिशा मिळेल, अशी अपेक्षा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली होती, जी आता पूर्ण झाली आहे.



