गडचांदूर येथे आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह संपन्न

चांदा ब्लास्ट
गडचांदूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात ठाकरी (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) येथील रुपचंद पिंकू दुर्गे आणि सुलभा विलास बोलगोडवार यांचा आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह 5 सप्टेंबर रोजी सकाळी संपन्न झाला. हा विवाह भारतीय बौद्ध महासभा, गडचांदूर यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला होता. बौद्धाचार्य बादल चांदेकर यांनी हा विवाह विधिवत पार पाडला.
रुपचंद पिंकू दुर्गे हे बौद्ध समाजाचे असून, सुलभा विलास बोलगोडवार या पेरकी (OBC) समाजाच्या आहेत. दोघेही ठाकरी गावचे रहिवासी आहेत. या आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहाच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला. या विवाह सोहळ्याला भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य श्रावण जीवणे, उत्तम परेकर, पद्माकर खैरे, राहुल निरंजणे, हिरा कऱ्हाडे, आशा सोंडवले, शिला निरंजणे,बेबी वाघमारे, कैलास ताकसांडे, शुद्होधन खैरे, किशोर निरंजणे यांच्यासह अन्य मान्यवरांनी पुढाकार घेतला. यावेळी मुलाचे आणि मुलीचे निवडक नातेवाईक उपस्थित होते.
हा विवाह सामाजिक एकतेचे प्रतीक ठरला असून, भारतीय बौद्ध महासभेच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. अशा विवाहांमुळे समाजातील जातीय आणि धार्मिक भेदभाव कमी होऊन समता आणि बंधुत्वाला प्रोत्साहन मिळेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
या विवाह सोहळ्याने गडचांदूर परिसरात सामाजिक सलोख्याचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. नवविवाहित जोडप्याला उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.