मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात पार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना : पंचायत समिती कोरपना यांच्या वतीने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत ४ सप्टेंबर रोजी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींसाठी तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक तसेच पंचायत समिती अंतर्गत विविध विभाग प्रमुखांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शनासाठी गटविकास अधिकारी सन्मा. पुंडलिकजी पाल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे, तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी सन्मा. निवृत्ता झाडे हे मान्यवर उपस्थित होते.
ग्रामविकासासाठी उपक्रमनिहाय मार्गदर्शन
या कार्यशाळेत शासनाचा निधी, राष्ट्रसंतांचे विचार व वैज्ञानिक दृष्टी यांचा योग्य वापर करून सर्वांगीण ग्रामविकास कसा साध्य होऊ शकतो, यावर चर्चा झाली. ग्रामविकास विभागाच्या या महत्वाकांक्षी अभियानात प्रत्येक ग्रामपंचायतीने सक्रिय सहभाग घेऊन गावोगाव विकासाची नवी दिशा निर्माण करावी, असे आवाहन मान्यवरांनी केले.
लोकप्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग
ग्रामपंचायत बाखर्डीचे सरपंच सन्मा. अरुणजी रागीट, सांगोडा ग्रामपंचायत सरपंच श्रीम. संजनाताई बोंडे, निमनीचे सरपंच श्री. अतुलजी धोटे यांच्यासह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी कार्यशाळेत उपस्थित होते.
यावेळी सन्मा. अरुणजी रागीट यांनी “ऑक्सिजन पार्क” या अभिनव उपक्रमाचा उल्लेख करून ग्रामविकासासाठी नवा आदर्श मॉडेल मांडला. तर विस्तार अधिकारी (प) श्री. दादाराव पवार यांनी अभियानाच्या अंमलबजावणीबाबत उपक्रमनिहाय सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची रूपरेषा
• प्रास्ताविक : श्री. पुंडलिकजी पाल, गटविकास अधिकारी
• संचालन : श्री. बी. एस. काळे, विस्तार अधिकारी
• आभारप्रदर्शन : कु. शिवानी मस्कावार, स्था. अभियंता
या कार्यशाळेतून “समृद्ध पंचायतराज अभियान” तालुका पातळीवर प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक दिशा, माहिती आणि प्रेरणा सर्व उपस्थितांना मिळाल्याने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.