मनपाचे प्रभारी प्रशासन अधिकारी नागेश नित निवृत्त

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रभारी प्रशासन अधिकारी नागेश नित वयाची 58 वर्षे पुर्ण करून शासकीय नियमाप्रमाणे 31 ऑगस्ट रोजी निवृत्त झाले.मनपा मुख्यालयात झालेल्या गौरव सेवापुर्ती सोहळ्यात आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते नागेश नित व त्यांच्या पत्नी यांचा शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
सहायक शिक्षक पदापासून रुजू झालेले नित सेवेची 38 वर्षे पूर्ण करत प्रभारी प्रशासन अधिकारी पदावर निवृत्त झाले.मनपा शाळांना डिजिटल बनविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. विद्यार्थ्यांची पटसंख्या 70 विद्यार्थ्यांपासून 4040 पर्यंत नेण्याचे कार्य त्यांनी व त्यांच्या शिक्षक सहकाऱ्यांनी केले. त्यांच्याच काळात आठवड्यातुन एकदा दफ्तराविना शाळा घेण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला जो आता संपूर्ण राज्यात राबविण्यात येतो.
मनपा शाळांमधील विद्यार्थी साधारणतः गरीब घरातील असतात. या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकविण्यास मनपा शिक्षक स्वतः इंग्रजी शिकले, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ( एनएमएमएस ) परीक्षेत मनपा विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होण्याचे प्रमाणही त्यांच्याच काळात वाढले.कोरोना काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन नये याकरिता ऑनलाईन शिकविणे, ज्यांना ऑनलाईन शक्य नसेल त्यांना प्रत्यक्ष घरी जाऊन शिकविणे अश्या अनेक प्रयत्नांनी मनपा शाळांचा दर्जा उंचाविण्यास नागेश नित यांच्या प्रयत्नांनी मदत झाली.
आयुक्त विपीन पालीवाल यांनी त्यांची भावी आयुष्याबद्दल शुभकामना दिल्या. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले,मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे,मुख्य लेखापरीक्षक मनोज गोस्वामी,शहर अभियंता रवींद्र हजारे,सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,सहायक आयुक्त अनिलकुमार घुले,सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,डॉ.नयना उत्तरवार,डॉ.अमोल शेळके,उपअभियंता रवींद्र कळंबे, चैतन्य चोरे तसेच सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.