तीव्र उन्हाळा आणि हवामान बदलाला सामोरे जाण्यास मनपाचे पाऊल
चंद्रपूर महानगरपालिका व आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया यांच्यात करार

चांदा ब्लास्ट
3 वर्षांची भागीदारी – शहरी उष्णता आणि पूर यावर उपाय करण्यासाठी एकत्रित प्रयत्न
200 हून अधिक गरजू कुटुंबांची घरे थंड ठेवण्यासाठी खास तंत्रज्ञानाचा करणार वापर
टाटा ट्रस्ट्सच्या मदतीने, सर्वसामान्यांसाठी हवामान अनुकूल शहरे उभारण्याचा उपक्रम
हवामान बदलामुळे वाढता धोका लक्षात घेता, चंद्रपूर महापालिका आणि आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया यामध्ये 3 वर्षांसाठी करार करण्यात आला असुन उष्णता आणि पूर यांसारख्या अडचणींवर उपाय शोधले जातील. टाटा ट्रस्ट्स या उपक्रमासाठी पाठबळ देत असुन यामध्ये स्थानिक लोकांचा सहभाग आणि शाश्वत (टिकाऊ) शहर विकास यावर भर दिला जाईल.
या सहकार्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी हवामानाशी जुळणारे बदल करणे जसे की अतिउष्णता किंवा अतिवृष्टी यामुळे पुराचा धोका ओळखणे, नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन उपाययोजना करणे इत्यादी अनेक कामे केली जातील.त्याचप्रमाणे 200 हून अधिक गरजू कुटुंबांची घरांमध्ये उष्णता कमी करणाऱ्या उपायांचा अवलंब केला जाईल, जे उन्हाळ्यात घराचे तापमान कमी करण्यात मदत करतील. त्यांच्या परिणामाचा अभ्यास करू इतरांना या उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले जाईल.
जमिनीचे तापमान, अधिक वेळ टिकून राहणारी उष्णता,जोखीम मूल्यांकन व इतर नैसर्गिक संकटांचा अभ्यास करून आवश्यक भागांमध्ये उपाय योजले जातील. काही शाळा व महापालिकेच्या इमारतींमध्ये ऊर्जा आणि पाण्याचा कमी वापर करणारी उपकरणे बसवण्यात येऊन हरीत भाग वाढवण्यासाठीही प्रयत्न केले जातील. पूर धोका कमी करण्यासाठी निर्णय घेता यावा म्हणून पाण्याचा प्रवाह, भूजल यावर अभ्यास केला जाईल. पावसाचे पाणी मुरवण्यासाठी पेव्हर ब्लॉक्स, पुनर्भरण विहिरी असे काही प्रयोग देखील राबवले जातील.
या उपक्रमात नागरिकांना त्यांनी आपत्तीच्या काळात तत्काळ मदत कशी करावी याचे प्रशिक्षण देण्यात येईल, जेणेकरून ते स्वतःचे व इतरांचे संरक्षण करू शकतील.सदर वेळी उपायुक्त संदीप चिद्रावर,डॉ.नयना उत्तरवार,डॉ.अमोल शेळके, आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया चे सीईओ प्रेरणा लांगा, प्रकल्पप्रमुख जुबेर शेख, प्रकल्प व्यवस्थापक विक्रांत हरंखेडे, प्रकल्प समन्वयक हर्षल बारंगे तसेच समुदाय प्रेरक अमित नागदिवे, ऋतिक वाळके, शीतल मगार आणि योगिता खामणकर उपस्थित होते
“चंद्रपूरच्या भौगोलिक रचनेनुसार आणि नागरिकांच्या विविध गरजांनुसार आम्हाला अशा उपायांची गरज आहे जे स्थानिक पातळीवर उपयोगी पडतील व शास्त्रीय माहितीवर आधारित असतील. आगा खान एजन्सी व टाटा ट्रस्ट्स यांच्या सहकार्यामुळे आम्ही उष्णतेच्या लाटांपासून आणि पूर संकटांपासून संरक्षण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. हा उपक्रम चंद्रपूरला एक सुरक्षित, सर्वसमावेशक आणि हवामानदृष्ट्या मजबूत शहर बनवण्याच्या दिशेने पुढे नेईल.” – आयुक्त विपिन पालीवाल
“हा करार म्हणजे प्रत्यक्ष काम करणाऱ्या उपायांनी हवामान बदलास सामोरे जाण्याची सुरुवात आहे. आम्ही वैज्ञानिक अभ्यास आणि जमिनीवर राबवता येतील अश्या प्रयोगांद्वारे चंद्रपूरची उष्णता व पूर परिस्थितीच्या अडचणींवर काम करून चंद्रपूरला हवामान अनुकूल शहरात रूपांतरित करणे आमचे उद्दिष्ट आहे.” – प्रेरणा लांगा, मुख्य कार्यकारी अधिकारी, आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया
आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडियाबद्दल –
ही संस्था २०१६ साली स्थापन झाली असून ती लोकांना नैसर्गिक आपत्तींपासून सुरक्षित ठेवणे, हवामान बदलाशी जुळवून घेण्यास मदत करणे, आणि चांगल्या जीवनासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करते. ही संस्था ना नफा तत्वावर कार्य करणारी असुन सध्या ही संस्था महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणामध्ये काम करते.
.