स्वदेशी व राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवा – डॉ. नारायण मेहरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
भंडारा येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा जिल्हा अभ्यासवर्ग संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
भंडारा (प्रतिनिधी) : भंडारा येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भंडारा जिल्ह्याचा अभ्यासवर्ग उत्साहात पार पडला. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांनी ग्राहक पंचायतची सैद्धांतिक भूमिका व कार्यपद्धती यावर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. मेहरे यांनी सांगितले की, “संपूर्ण समाज हा ग्राहक आहे” या तत्त्वावर ग्राहक पंचायत कार्यरत असून संघर्ष नव्हे तर समन्वयाच्या मार्गाने ग्राहकांचे प्रश्न सोडवणे ही संघटनेची भूमिका आहे. शोषणमुक्त समाज घडवताना नैतिकता, प्रामाणिकपणा व पारदर्शकता हे संघटनेचे मूलभूत मूल्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्राहक संरक्षण कायद्याचा अभ्यास करणे, जनजागृती वाढवणे, तसेच स्वदेशी व राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून ग्राहक चळवळ मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. ग्राहक पंचायत कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसून संपूर्ण समाजाच्या हितासाठी कार्य करते, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
जिल्हा अभ्यासवर्गात विदर्भ प्रांत सचिव चारुदत्त चौधरी यांनी संघटन कार्याच्या विविध आयामांवर मार्गदर्शन केले. रोजगार सृजन, विधी व महिला आयाम, आयटी सेल, प्रचार-प्रसार आणि पर्यावरण या विषयांवर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. कार्यक्रमांचे प्रभावी संचालन, संवादकौशल्य आणि कार्यकर्त्यांची सक्रियता महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ कार्यक्रम न करता त्याचा प्रभाव समाजापर्यंत पोहोचतो का, याचे आत्मपरीक्षण गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युवकांना रोजगार मार्गदर्शन, कौशल्य विकास व स्पर्धा परीक्षांसाठी दिशा देण्याचे आवाहन त्यांनी केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भंडारा जिल्हा यांच्या वतीने जिल्ह्यातील ग्राहक कार्यकर्त्यांसाठी एकदिवसीय अभ्यासवर्गाचे आयोजन सोमवार, दिनांक २ फेब्रुवारी रोजी श्री सिद्ध चिंतामणी मंदिर, वेलकम कॉलनी, खातरोड, भंडारा येथे करण्यात आले. या अभ्यासवर्गास जिल्हाभरातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे उद्घाटन विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष जयंत सब्जीवाले यांनी केले. अभ्यासवर्गात ग्राहक पंचायतीची सैद्धांतिक भूमिका, विविध आयाम, ग्राहक संरक्षण कायदा, सीपीआरएफ व आयजीआरसी यांवर वर्धा येथील प्रमुख वक्ते ॲड. अविनाश प्रभुणे यांनी सखोल मार्गदर्शन केले, तसेच सायबर सेक्युरिटी या विषयांवर पोलीस उपनिरीक्षक रुचिरा पात्रे यांनी उपयुक्त माहिती दिली.
समारोपप्रसंगी पश्चिम क्षेत्रीय संघटनमंत्री नितीन काकडे यांनी कार्यकर्त्यांना संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा व नगर कार्यकारिणीने विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचलन दिप्ती कुरोडे व प्रा.डॉ. जयश्री सातोकर यांनी तर आभार प्रदर्शन अनिल शेंडे यांनी केले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रांत सहसचिव विलास ठोसर, चंद्रशेखर साठे, रविंद्र तायडे, कृष्णा खेडीकर, विष्णूपंत पण्डे , राजेश पांडे, प्रसिद्धी प्रमुख मो. सईद शेख जिल्हा आणि सात तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते



