आ. सुधीर मुनगंटीवार यांचा डॉक्टरांकडून हृद्य सत्कार
आ.मुनगंटीवार यांचा आयएमएने स्टँडिंग ओवेशन देऊन केला सन्मान

चांदा ब्लास्ट
डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही
चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने इंडियन मेडिकल असोसीएशनने हृद्य सत्कार केला. विशेष म्हणजे सर्व डॉक्टर मंडळींनी यावेळी उभं राहून (स्टँडिंग ओवेशन) आ. श्री. मुनगंटीवार यांना सन्मान दिला. हा क्षण अनुभवताना आ. मुनगंटीवार देखील भारावून गेले होते.
या कार्यक्रमाला इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष डॉ. रितेश दीक्षित, सचिव डॉ. सुश्रुत भुक्ते, डॉ. स्नेहल पोटदुखे व डॉ. मोनिका कोतपल्लीवार, भाजपचे महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. आ. श्री. मुनगंटीवार यांनी आयएमए आपला परिवार असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. तसेच उभं राहून दिलेल्या सन्मानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाच्या देहाशी सर्वाधिक जवळचं नातं जपणाऱ्या, वेदनेच्या काळोखात आशेचा दीप प्रज्ज्वलित करणाऱ्या डॉक्टरांच्या हातून आपला सन्मान होणे, हे मी आपले भाग्य समजतो. हा केवळ माझा वैयक्तिक सन्मान नसून माझ्या समाजकार्याला मिळालेलं प्रेम आहे. या सन्मानामुळे जबाबदारीची जाणीव अधिक गडद झाली आहे. याप्रसंगी डॉक्टरानी उभं राहून दिलेला सन्मान माझ्या हृदयात कोरला गेला आहे, अशी उत्स्फूर्त भावना आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
डॉक्टर हे खऱ्या अर्थाने जीवनदाते आहेत. आपण त्यांना सेवेचं साक्षात रूप मानतो. त्यामुळे अशा सेवाव्रती जीवनदात्यांच्या वतीने झालेला माझा सत्कार हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे. त्यांच्या आभारांसाठी शब्द अपुरे आहेत,” असे भावनिक उद्गार आ. सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.
आ.मुनगंटीवार पुढे म्हणाले, डॉक्टरांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच तत्पर असतो. त्यांच्या सेवाकार्याशी जोडले जाणं, हे माझ्यासाठी नेहमीच आनंददायी ठरतं.