ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा वाहतूक पोलिसांचे तत्पर्य; जखमी दुचाकीस्वाराचे प्राण वाचवले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा वाहतूक पोलिसांनी वेळेवर मदत करत जखमी दुचाकीस्वाराचे प्राण वाचवून मानवतेचे दर्शन घडवले आहे.

पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशान्वये आज दुपारी सुमारे 5.00 वाजता वाहतूक पोलीस सेलू–सेवाग्राम–पवणार परिसरात मोटार वाहन कायद्यान्वये कारवाईसाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पवणार पुलाजवळ एका दुचाकीस्वाराची मोटारसायकल स्लिप होऊन अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील व चालक स्वप्नील तंबाखे यांनी तात्काळ रस्त्यावर पडलेल्या जखमी इसमास सुरक्षित ठिकाणी हलवले. तसेच त्याची मोटारसायकल (क्र. MH-27 BS-1502) ही बाजूला करून वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेतली.

तात्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमी इसम राजेंद्र कुबळे (वय 50 वर्षे, रा. सुरगाव, जि. वर्धा) यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वेळेत प्रथमोपचार व वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे जखमीचा रक्तस्राव आटोक्यात आला व त्याचे प्राण वाचले.

जखमी इसमाचे भाऊ विजय रंगराव कुबळे (रा. सुरगाव) यांना घटनास्थळी बोलावून जखमीची मोटारसायकल, मोबाईल व इतर साहित्य त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या तात्काळ मदतीमुळे जखमीच्या भावाने वर्धा वाहतूक पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.

याप्रसंगी वर्धा वाहतूक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दुचाकी वाहने चालविताना वेगावर नियंत्रण ठेवावे, हेल्मेटचा नियमित वापर करावा व अपघातमुक्त प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये