प्रेरणा कन्स्ट्रक्शनकडून अपघातात मृत कामगाराच्या कुटुंबाला १६ लाखांची मदत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना : एल. अँड टी. कामगार संघाच्या मागणीवरून प्रेरणा कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीने प्रकृतीत बिघाड होऊन मृत झालेल्या सुभाष फुलचंद शेंडे यांच्या कुटुंबास १६ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. ही मदत एल अँड टी कामगार संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाली आहे.
सुभाष शेंडे यांचा मृत्यू कामावर नसताना झाला असतानाही, सामाजिक उत्तरदायित्व म्हणून एल. अँड टी. कामगार संघाचे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मध्यस्थीने व कार्याध्यक्ष शिवचंद्र काळे यांच्या नेतृत्वात ही मदत देण्यात आली. यामध्ये १५ लाख रुपये थेट कुटुंबास धनादेशाद्वारे देण्यात आले असून, अंत्यविधी व इतर कार्यासाठी एक लाख रुपये एकूण १६ लाख रुपये देण्यात आले. एक लाख रुपये वैद्यकीय खर्च प्रेरणा कन्स्ट्रक्शनने वेगळे केले आहेत.
मृत सुभाष यांच्या ठिकाणी त्यांची मोठी बहीण उज्वला उमाजी वाकडे यांना कामावर घेण्यात येणार आहे. कामगार संघाच्या कार्यालयात शुक्रवारी या मदतीचा धनादेश कुटुंबाकडे आईचे नावे सुपूर्त करण्यात आला. यावेळी संघाचे पदाधिकारी नरेंद्र पांडे, गजानन बोडेकर, जनार्दन ढोले, बंडू उरकुडकर कामगार संघाचे इतर पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.
ही मदत प्राथमिक स्वरूपाची असून, लवकरच ग्रॅज्युएटी, पीएफ व इन्शुरन्स कंपनीकडून सुमारे ५ लाख रुपयांची अतिरिक्त रक्कम कुटुंबास मिळण्याची शक्यता आहे.
– शिवचंद्र काळे कार्याध्यक्ष एल अँड टी कामगार संघ
कामगार संघाने दाखवलेली संवेदनशीलता आणि प्रेरणा कन्स्ट्रक्शनने घेतलेली जबाबदारी समाजात एक सकारात्मक संदेश देणारी बाब ठरली आहे. घरातील करता व अविवाहित मुलगा मरण पावल्याने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. या मदतीमुळे कुटुंबाला आधार मिळाला आहे.