घरफोडीच्या गुन्ह्यात अवघ्या सहा तासांत आरोपीसह मुद्देमाल जप्त
जिवती पोलिसाची उत्कृष्ट कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- जिवती येथे दिनांक ११ जुलै २०२५ रोजी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद झाली असून, जिवती पोलिसांनी अवघ्या सहा तासांत आरोपीसह मुद्देमाल जप्त करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या कारवाईमुळे सामान्य जनतेमध्ये पोलिसांबद्दल आदर आणि विश्वास वाढला आहे.
पोलीस स्टेशन जिवती येथे अपराध क्रमांक ६३/२५ अंतर्गत कलम ३०५, ३३१ (३) भा. द. संहिता अन्वये घरफोडीचा गुन्हा नोंदवला गेला. या गुन्ह्यातील आरोपी सुनिल बालु चव्हाण (वय ३० रा. करणकोंडी) यास पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. गुन्ह्यातील ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल, ज्यात एक चांदीची अंगठी, एक कर्णफूल आणि हातातील कोपरे यांचा समावेश आहे, जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव (गडचांदूर) यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सपोनि प्रविण जाधव यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत पोलीस शिपाई जगदीश मुंडे (ब. न. १३८८), अतुल कानवटे (ब. न. २०५८) आणि किरण वाठोरे (ब. न. २८) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
जिवती पोलिसांच्या या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास आणि आदराची भावना निर्माण झाली आहे. अशा प्रकारच्या कार्यक्षमतेमुळे पोलिस दलाचे कौतुक होत आहे.