अनाथ मुलीची विलक्षण संघर्षगाथा : शिवचंद्र नाट्यकला रंगभूमीचे ‘अंधारातील लाल दिवा’ : प्रा. राजकुमार मुसने, गडचिरोली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमी ही गावोगावी होणाऱ्या नाट्य परंपरेने समृद्ध आहे. दरवर्षी नवीन २५ ते ३० नाटके आणि अडीच हजारपेक्षा अधिक प्रयोगामुळे झाडीपट्टीची सर्वदूर ख्याती झाली आहे. झाडीपट्टीतील अनेक नाट्यमंडळे परिश्रमपूर्वक निष्ठेने समाजाला काही देण्याच्या सामाजिक बांधिलकीतून कार्य करताना दिसतात. केवळ आर्थिकते पुरतेच सीमित न राहता अथवा व्यावसायिकतेकडेच लक्ष न देता नाटकाच्या माध्यमातून रंजन व प्रबोधनाचा वसा आणि वारसा चालविणारी मंडळी आहेत. त्यापैकी शिवचंद्र नाट्य कला रंगभूमी वडसा या मंडळाचे नावही गौरवाने घ्यावे लागेल .नुकताच या सीजनमधील त्यांच्या 101 वा नाट्यप्रयोग नरचुली ,ता. आरमोरी येथे झाला. सामाजिक बदलासाठी हातभार लावू पाहणाऱ्या नवतेच्या ध्यासाने धडपडणार्या रंगकर्मींच्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. शिव चंद्र नाट्य कला रंगभूमी वडसा इंजिनियर प्रवीणकुमार येडे व मयूर बोरकर निर्मित, सिने राहुल वासनकर व अभिनयसम्राज्ञी ज्ञानेश्वरी कापगते दिग्दर्शित ,शिल्पा पाटील लिखित, ‘अंधारातील लाल दिवा ”या नाट्यप्रयोगाचे आयोजन नवतरूण नाट्यकला वैभव नरचुली, जि.गडचिरोली येथे नऊ मार्चला करण्यात आले. विपरीत ते तुलाही उज्वल आशादायी निर्मितीचे स्वप्न साकारणारा अभिनव नाट्याशय, कसदार कलावंतांचा जबरदस्त अभिनय, गतिमानता, पारंपरिक ढाचा तोडणारा विलक्षण विनोद या वैशिष्ट्यामुळे ‘अंधारातील लाल दिवा’ नाट्यप्रयोग प्रेक्षकांच्या भरगच्च प्रतिसादात यशस्वीरित्या संपन्न झाला.
अनाथ पण जिद्दी मुलीच्या संघर्षाची कहाणी, दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या मुलीची धडपड, सामाजिक बांधिलकी जोपासून इतरांसाठी उदात्त भावनेने काहीतरी करू पाहणाऱ्या अग्रगामिनी स्त्रीची यशोगाथा, सर्वस्व गमावल्यानंतरही आयुष्य सजवता येऊ शकते ही प्रेरणादायी ऊर्जा, सर्व बाजूने दडपशाही सुरू असताना सुद्धा आंतरिक शक्तीच्या बळावर जिद्दीने यशप्राप्ती शक्य असल्याचा आशावाद, परिस्थितीने हातबल झाल्यानंतरही फिनिक्स पक्षाप्रमाणे उद्दिष्ट पूर्तीसाठीची झेप,
बिकटतेतूनही योग्य मार्ग चोखाळता येतो, हे दर्शविणारे नाट्य म्हणजेच ‘अंधारातील लाल दिवा होय.
समाजकंटकाच्या स्वैराचारी व लालची वृत्तीमुळे बिकट वाटेत पडलेल्या, वेश्या व्यवसायासारख्या लांच्छनास्पद मार्गातूनही उज्वल आशेच्या किरणाकडील प्रवास अर्थात ‘रेशमा ते रेशमबाई हा अनोखा प्रवास म्हणजे हे नाटक आहे.
आई-वडिलांच्या निधनामुळे अनाथ झालेली रेश्मा मामाकडे आश्रय घेते. व्यसनी मामाच्या जाचाला कंटाळूनही हताश, अगतिक, हतबल झालेली, पोटाची भूक भागविण्याकरिता दोन वेळच्या अन्नाचीही भ्रांत असलेली रेशमा मात्र महामानवाच्या विचाराने प्रेरित होऊन शिक्षणाचा ध्यास घेते. ‘पुस्तक वाचून का अंबाडीचा भुरका भेटते ?’१७ वी पर्यंत शिकून साधी चपराशीची नोकरी मिळत नाही.असे पदोपदी हेटाळणी करणाऱ्या मामाला शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून सुसंस्कृतता,सुजानतेसाठी महत्त्वाचे असल्याचे पटवून सांगते. धुणी,भांडी, काड्या, अन्न शिजवणे, स्वयंपाक करणे अशी सगळी कामे करूनही दारिद्र्यावर मात करीत शिक्षण अविरत चालू ठेवते. मामाच्या तगाद्यानंतरही लग्नास विरोध करून उच्च शिक्षण घेऊन अधिकारी होण्याचे स्वप्न रंगवते. दुसरीकडे अजय मराठे मात्र आपल्या दोन्ही भावंडांचा सांभाळ करीत दिवसभर कॉलेज व रात्रभर हमाली करतो . उच्च शिक्षण व अभ्यास चालूच ठेवतो. जिद्द, चिकाटी, परिश्रम व सातत्यामुळे सर्व संकटावर मात करून अजय पोलीस अधिकारी बनतो. बेरोजगाराच्या विळख्यात अडकलेल्या नैराश्यग्रस्तांना अजय व शीतल हे प्रेरणादायी आशेचा किरण ठरतात.दडपशाही वृत्ती कितीही प्रबळ असली तरी मात्र ध्येयनिष्ठतेच्या मार्गात कोणीही आड येऊ शकत नाही, किंबहुना यशोशिखराकडे वाटचाल करणाऱ्यांना कोणीही अवरोध करू शकत नाही, हेच रेश्मा पुंडलिक देशमुख यांच्या कर्तृत्वातून प्रेक्षकांना प्रत्ययास येते. अर्थातच नाट्यलेखिका शिल्पा पाटील या नाटकाद्वारे सामाजिक संदेश देण्यात यशस्वी ठरल्या आहेत.
‘अंधारातील लाल दिवा ‘ या नाटकातून प्रामुख्याने रंगराव मामा या पात्राच्या माध्यमातून व्यसनाधीनता दर्शविली आहे. गरीबीत जन्म घेतला हा सगळ्यात मोठा गुन्हा जरी असला तरी मात्र तिथून बाहेर पडण्यासाठी शिक्षण हाच उत्तम मार्ग असल्याचे सूचनही नाटककाराने उत्कटपणे केले आहे.तर रेशमाच्या पात्रातून संघर्षाची गाथा दाखविली आहे.
‘साक्षर जनता भूषण भारता’ या ब्रीदातील अशाच पद्धतीचा अधोरेखित करत उच्चशिक्षितही ‘गाडीवाला आया भैय्या कचरा निकाल’ अशी आरोळी देत घरोघरी भटकंती करीत असल्याचे वास्तव उपरोधिकपणे दर्शविले आहे. अर्थातच सुशिक्षित बेरोजगारांची व्यथा नाटकातून मांडलेली आहे.
अनाथ, शिक्षणाचे महत्त्व जाणणारी, अभ्यासू, गावातील दारूबंदीसाठी पुढाकार घेणारी, जिद्दी,ध्येयवादी,सहनशील,आशावादी, प्रेमळ, प्रसंगी कणखर ,डेयर्ड रेशमा पुंडलिक देशमुख (ज्ञानेश्वरी कापगते), व्यसनी रंगराव मामा (आशिष उईके), उच्च शिक्षण घेणारा परिश्रमी जिद्दीन भावंडांचे संगोपन करीत नोकरीसाठी धडपडणारा आणि प्रयत्नपूर्वक पोलीस बनलेला, प्रामाणिक,अवैध धंद्यांना आळा घालणारा अधिकारी अजय मराठे (राहुल वासनकर), अवैद्य मार्गाने संपत्ती जमवून राजकारणात सक्रिय झालेला सरपंच ते बालविकास मंत्री पर्यंत यशस्वी राजकीय प्रवास करणारा,या सिस्टीमला देतो आव्हान तोच विश्वजीत चव्हाण, (अंकुश गवळी), काळया धंद्यात सक्रिय असलेला आणि वेश्याव्यवसायाकरिता मुलींना प्रवृत्त करून वाम मार्गाने पैसा कमविणार लालची, चमडी
बेचके दमडी कमाने वाला भडवा बिल्ला (आशिष उईके), हुशार, अभ्यासू ,परिश्रमी कलेक्टरचे स्वप्न साकार करण्यासाठी धडपडणारी शीतल (सुहानी), गवंडी काम करीत पेपर वाटून उपजीविका करणारा, श्रीमंतांच्या नंदिनीवर सच्चा प्रेम करणारा,परिश्रमी निशांत ( स्वर.विक्की गायकवाड), प्रचंड श्रीमंत राजकारणात सक्रिय मंत्री असलेला
विश्वजीत चव्हाण यांची एकुलती एक निरागस मुलगी, निशांतवर जीवापाड प्रेम करणारी नंदिनी (टीना उराडे), भंगारविक्रेता विनोदवल्ली लाला (एम के जादूगार), लालाची पत्नी(शिल्पा पाटील), बबल्या (मास्टर पप्पू ) या पात्रांच्या क्रिया प्रतिक्रियातून नाट्य उलगडते.
नंदिनीवर प्रेम करणाऱ्या मुलाला गुंडांकरवी मारणे, नंदिनीचे निशांतवर प्रेम असतानाही वडील आणि राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या मुलाशी लग्न लावण्याचा प्रयत्न ,परिणामी नंदिनीने विष घेऊन जीवन संपविणे, प्रेम विरहाने निशांत वेडा होणे, अजयचा बहीण शीतलचा शोध, त्रस्तता, प्रेयसी रेशमा कुठे दूर गेली तिच्या आठवणीने बेचैन होणे,
दारूबंदीकरिताचे महिला आंदोलन, पाच हजार महिलांचे स्वाक्षरीचे निवेदन, बाल विकास मंत्रांकडून नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार, वेश्या व्यवसायात रवानगी, कोटीचालक रेशमबाई ,
समाजात मानाचे स्थान मिळवण्यासाठी धडपडणारी, मान वर करून लाल दिव्यातून कोटीतील मुली अधिकारी बनून फिरल्या पाहिजे आणि अंधारातील लाल दिवा बनून जळण्याचा ध्यास घेणाऱ्या रेशमबाईचे प्रयत्न व धडपडणाऱ्या शीतलची स्वप्नपूर्ती, अजयचे यश संपादन म्हणजेच हे नाटक होय.
कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अजय मराठे अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी कोटीवर धाड टाकतो.
त्याला रेशीमबाई वास्तविकता कथन करीत खडसावते. रेशीमबाई लालची खल प्रवृत्तीच्या बिल्लाला खूप मारते , गळ्यात चपलांचा हार घालून धिंड काढत पोलीस अधिकारी अजय मराठे यांच्या स्वाधीन करते . अजय मराठी बिलाच्या माध्यमातून मंत्री विश्वजित चव्हाण यांच्या क्रूर करण्याची सर्व पुरावे गोळा करतात. वेश्या वस्तीच्या पुनर्वसनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात उपस्थित झालेल्या भ्रष्ट, अत्याचारी , शालीन मुलींचे चारित्र्य हनन करून वेश्या व्यवसायाकडे ढकलणाऱ्या क्रूर
करम्याचे सर्व कारणामे उघडकीस आणते.
झाडीपट्टी रंगभूमीवर असलेल्या विनोदांपेक्षा या नाटकातील विनोदाचा बाज पूर्णत: वेगळा व रसिकप्रिय आहे. टीनटप्पर ,भंगार, कबाडीवाला लाला, त्याची पत्नी ललिता आणि बबल्या अर्थात एम के जादूगर, शिल्पा पाटील आणि मास्टर पप्पू या त्रिकूटाने विलक्षण पंचवर पंच मारीत प्रेक्षकांना हसवत घायाळ केले.
एकच बायको आणि आंधनातील साला यामुळे लालाची होणारी परेशानी त्यातून उद्भवणाऱ्या प्रसंगातील विनोदाने पेक्षक हसतात. अंधारातील दिवा
लाडकी बहीण,ऑनलाइन शाळा, पोचकपाच, चोपाडी ,गिधाडे, पोंगाडफाशी , फाटली आहे का, तिखट मिरची ,सिमला मिरची , बंट्या, घंट्या, संट्या, कारी कुत्री, डसलो ,नाजूक मैना,आंबे शीलने, उरकुड , हेदारवादाड, बुंडूर , झालरा, फलकारु, बंबोरा, पोंगा, झोंगेबोंगो, पोकपोक अशा विलक्षण शब्दोच्चाराने हास्यास्पदता निर्माण होते. शिवाय
एकावर चौका तळ्यात सुटली नौका ,तिरीवर झिरो चुलीत जाऊन शिरो या ऑनलाइन गेम विषयीच्या संवादाने तर प्रेक्षागृहात प्रचंड हशा पिकला. बबल्याने दिलेली आत्महत्याची धमकी, ललिताची फॅशनेबल झालेली लॉली, तिची फॅशन ,कमॉन, हुटिंगड, चुम्मे, फिगर त्रिकुटाच्या गंमतीदार संवादामुळे प्रेक्षक पोट धरून हसायला लागतात. बबल्याने शहरातून येताना कपडे आणणे व दहा हजार रुपये सोबत आणण्याचे सांगण्यावरून पात्रातील स्वभाव बदलानेही प्रेक्षक सुखावतो.त्याचप्रमाणे बंधन दिलो के बंधन ,गाडी घुंगराची ,गेली गेली सारीच गेली जीवनाची खुशी, रागानं तुझं बघणं एम के जादूगर यांच्या विनोदी गीतामुळे व मिरगीच्या अभिनव अभिनयाने प्रेक्षक प्रचंड हास्यरसात बुडाले.एम के जादूगर यांचा बहारदारपण,शिल्पा पाटील यांची बिनधास्त अभिनय शैली आणि मास्टर पप्पू यांची साथ यामुळे प्रयोगात चांगलीच रंगत आली.
नाटकातील गीतेही महत्वपूर्ण आहेत . ‘मित्र हा वणव्यामध्ये गारव्यासारखा…’,’हे ज्ञानेश्वरी कापगते यांनी गायलेले गीत मित्रत्वाच्या प्रसंगा अनुकूल आहे. तर स्वरबहार गीतकार,गायक विक्की गायकवाड यांच्या ‘गीत निळ्या आकाशी चंदना सजली कशी तू’,’या क्षणी घे सखे निळ्या आकाशी चंद्र हा सजला मोरणी समान तुझी माझी प्रीत कशी ग जुळली अफाट’,वासनांध नराधमाने केले विषारी डंख, झेप घेणाऱ्या पक्षिणीचे छाटले पंख ..अंधारातून लाव दिला”,,”मनातल्या यातनांच्या ….सर्वस्वाचे दान तुम्हाला”, संपला रे श्वास माझा देह सारा संपला प्रेम सागरी संपले रे’, या आशय सूचक गीतांनी व आर्गन विजय लाटेलवार,.तबला विशाल कुळमेथे , ॲक्टोपॅड विक्की रोकडे यांच्या संगीत साथीने प्रयोगात चांगलीच रंगत आणली.
अनाथ रेश्मा ,मामाच्या जाचाला कंटाळलेली सहनशील , विश्वजीतच्या अत्याचाराला बळी पडलेली, कोटा नंबर 111 सांभाळणारी, जिद्दी मुलींना शिक्षणासाठी प्रेरित करणारी, आपल्यावर झालेल्या अपमान व सुडाचा बदला घेणारी रेश्मा अभिनय सम्राज्ञी ज्ञानेश्वरी कापगते यांनी अप्रतिम साकारली. मामाची सेवा करणारी नम्र रेशमा, अभ्यासात हुशार असणारी शिक्षणप्रेमी रेशमा, अजयवर निस्सीम प्रेम करणारे प्रेयसी महिला आंदोलनात पुढाकार घेणारी नेतृत्व संपन्न रेशमा, राजकारणी बालविकास मंत्र्याच्या अत्याचाराला बळी पडणारी असहाय्य रेशमा , कोटीवाली रेशमा, वेश्या व्यवसाय चालविणारी बिनधास्त रांगडी , मंत्रावर गोळी घालणारी आक्रमक , सुडाचा बदला घेणारी, समाजकंटकावर वचक निर्माण करणारी, धरपडणार यांच्या आयुष्यातील उजेड बनणारी अशी रेशमाची विविध रूपे नाटकातून साकार होतात.रेशमाची शिक्षणासाठीची तगमग, रेशमाचे आक्रंदन,टाहो, व्यथा, तडफड,अस्वस्थपणा व रणरागिणत्व सकस व कसदारअभिनय पैलूंने वटवीत प्रेक्षकांना थक्क करीत ज्ञानेश्वरी कापगते यांनी नाटक उंचीवर नेले. अभिनय सम्राज्ञी ज्ञानेश्वरी कापगते यांचा अष्टपैलू अभिनय,सिने राहुल वासलवार, आशिष उईके अंकुश गवळी यांचा जबरदस्त अभिनय, रेशीमबाई ज्ञानेश्वरी ताईंचा रांगडेपणा, हिंदीतूंन बोलणे, वेशभूषा व देहबोलीमुळे कोटीवालीहुबेहूब साकारली.शिल्पा पाटील यांची बिनधास्त शैली,एम के जादूगर यांची विलक्षण कॉमेडी, पप्पू भुरे यांची देहबोली,सुहानी व टिनाचा अंगीक अभिनय, स्वरबहार विक्की गायकवाड यांच्या सुमधुर गायनाने प्रयोग अप्रतिम झाला. सायकल, पेपर विक्रेता, भंगार, कबाडीवाला,कोटी असे प्रसंगानुरूप नेपथ्य व दिग्दर्शकाच्या कल्पकतेमुळे योग्य जागाची निश्चिती केल्यामुळे प्रयोगात परिणामकारकता आली.
प्रत्येकाला असं वाटतं की आपलं नाव मोठं व्हावे,लग्न करावे,मुले व्हावेत, चांगलं कुटुंब संसार व्हावा परंतु काही समाजकंटक मात्र आमच्या इच्छा स्वप्नांना धुळीस मिळवत दोष नसतानाही उकिरड्यात लोटतात. मग सुरू होतो आमचा यातनामय प्रवास आणि बुरखा पांघरून विक्षिप्त जीवन जगावे लागते.
वेश्या व्यवसायातील नरकयातना, विदारकता नाटकातून सुचित होते. किंबहुना कोट्यावर येणाऱ्या प्रत्येक महिला या शारीरिक हयासीतून, शारीरिक उपभोगासाठी आलेल्या नाहीत. तर त्यांना येथील समाजकंटक जबरदस्तीने ढकल्याचे वास्तव समोर येते. येथे येण्याचा मार्ग आहे परंतु बाहेर जाण्याचा मार्ग नाही. रँडी औरत नही होती, उसको दिल नही होता, दर्द नही होता क्या? हा प्रश्न अस्वस्थ करणार आहे. बिललाने चॉकलेटचे आमीष देऊन जबरदस्तीने या व्यवसायात ढकललेल्या शीतलच्या मनामध्ये अधिकारी बनण्याची महत्वकांक्ष आहे. परंतु कॉलेजमध्ये शीतलशी इतर मुली मैत्री करीत नाहीत, टॉर्चर केलं जातं , दुय्यम वागणूक दिली जाते. अवहेलना, अपमान ,तिरस्कार केला जातो. अशा वेळेस मात्र रेश्मा शितलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते.पुस्तकांशी मैत्री कर ,कोळशाखाणीतच हिरा जन्माला येतो, चिखलातूनच कमळ उदयास येतो. ध्येयाकडे लक्ष दे ,या समाजात मानाचे स्थान मिळवायचे असेल, मान करून जगायचे असेल तर लाल दिवा मिळाला पाहिजे, अधिकारी बनले पाहिजे ,अंधारातील लाल दिवा बनून जळण्याच्या ध्यास मनामध्ये बाळगण्याचा सल्ला रेशमबाई शितलला देते आणि हीच प्रेरणा शीतलला आयएएस अधिकारी बनवते.’रंडी की बेटी रंडी नहीं तो अफसर बनेगी, शीतलच्या जीवनातून ही संघर्षमय यशोगाथा प्रत्ययास येते. निश्चितच नाट्य लेखिका शिल्पा पाटील यांनी वेगळा विषय हाताळला असून व कलावंताने उत्तम साकारला आहे.
विश्वजीत चव्हाण, बिल्ला सारखे समाजकंटक आमच्या विदारकतेला जबाबदार आहेत.अशा आमचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या विध्वंसक लोकांना जगण्याचा अधिकार नाही. असे म्हणतात विश्वजीत चिडून अजयकडील पिस्तूल उचलतो पण अजयने धक्का मारताच ती रेशमाच्या हाती वजाते. रेश्मा गोळी झाडते आणि मंत्री जाग्यावर गतप्राण होतो. क्रूरकर्माला शिक्षा मिळाली आणि एक तरी कोठ्यावरील मुलगी मानाचे स्थान मिळवून देण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद रेश्मामध्ये आहे .अजय रेश्माला महान आहेस म्हणून आभार मानतो. आता ही रेशीम बाई नाही तर सौ. रेशमा अजय मराठे बनते. निश्चितच झाडीपट्टी रंगभूमी हीआवर्तातून बाहेर पडत कात टाकून वैविध्यपूर्ण विषयाने व प्रभावी सादरीकरणामुळे कक्षा रुंदावत असल्याचा प्रत्यय ”अंधारातील लाल दिवा’ नाटकाच्या माध्यमातून आला. वेश्याव्यवसायात अडकलेली मुलगी ते कलेक्टर यशोगाथा असलेले हे नाटक आवर्जून पहावे, असे आहे.
प्रा. राजकुमार मुसणे,गडचिरोली