“संविधान फक्त कायद्याचं पुस्तक नाही, तर लोकशाही जीवनाचा प्राण आहे” – अरविंद पोरेड्डीवार

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : सरदार पटेल महाविद्यालयातर्फे प्रकाशित वार्षिकांक ‘शब्दगंधा’ (शैक्षणिक सत्र 2024-25) चा भव्य प्रकाशन समारंभ अत्यंत गौरवशाली वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अरविंद पोरेड्डीवार, उपाध्यक्ष मा. श्री. सुधर्शन निमकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, शब्दगंधा प्रमुख व संपादक डॉ. शैलेंद्रकुमार शुक्ल, सहसंपादिका डॉ. पद्मरेखा धनकर, डॉ. भारती दीक्षित व सहसंपादक मंडळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या संपादक मंडळाने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘शब्दगंधा’ महाविद्यालयातील प्रतिभावंत लेखणींना आपली क्षमता दाखविण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देते. विद्यार्थ्यांनी कविता, कथा, निबंध आणि लेखांच्या माध्यमातून आपली कल्पनाशक्ती व सामाजिक जाणीवा ज्या प्रकारे व्यक्त केल्या आहेत, त्या अनुकरणीय व प्रेरणादायी आहेत.
वार्षिकांक ‘शब्दगंधा’ चे प्रकाशन संस्था अध्यक्ष मा. श्री. अरविंद पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्री. सुधर्शन निमकर, प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, शब्दगंधा प्रमुख डॉ. शैलेंद्रकुमार शुक्ल, सहसंपादिका डॉ. पद्मरेखा धनकर व डॉ. भारती दीक्षित यांच्या हस्ते पार पडले.
अध्यक्षीय मनोगतात अरविंद पोरेड्डीवार यांनी विद्यार्थ्यांच्या लेखनाचे कौतुक करताना म्हटले
“‘शब्दगंधा’ ही फक्त पत्रिका नाही तर विचारांचे व्यासपीठ आहे. विशेष म्हणजे या वर्षीचे मुखपृष्ठ भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी कल्पकतेने साकारले आहे. हे त्यांची जागरूकता आणि सृजनशीलता दर्शविते. संविधान हे फक्त कायद्याचे पुस्तक नाही, तर भारताच्या लोकशाही जीवनाचा प्राण आहे, आणि विद्यार्थ्यांनी याचे रचनात्मक स्वरूपात केलेले सादरीकरण महत्त्वाचा संदेश देणारे आहे.”
संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सुधर्शन निमकर म्हणाले की, ‘शब्दगंधा’ सारख्या पत्रिका विद्यार्थ्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्व विकासात सहाय्यक ठरतात. ही पत्रिका साहित्यिक प्रतिभेबरोबरच सामाजिक जाणीवा आणि सांस्कृतिक मूल्ये जपते.
शब्दगंधा चे संपादक डॉ. शैलेंद्रकुमार शुक्ल यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हटले –
“साहित्य हे फक्त शब्दांचा खेळ नाही, ते विचारांचे आरसे आहे, भावनांची अभिव्यक्ती आहे आणि आत्म्याची हाक आहे. विद्यार्थी जेव्हा आपली लेखणी चालवतात, तेव्हा फक्त अक्षरे उतरतात असे नाही, तर भविष्यातील चित्र आकार घेत असते.”
सूत्रसंचालन डॉ. भारती दीक्षित यांनी केले आणि आभारप्रदर्शन सहसंपादिका डॉ. पद्मरेखा धनकर यांनी केले.
या प्रसंगी सर्वोदय शिक्षण मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, शिक्षक-बाह्य कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.