क्रीडा स्पर्धेत संघभावना, शिस्त आणि सामाजिक ऐक्य घडविण्याची प्रभावी ताकद- आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
आमदार चषक अंतर्गत पुरुष व महिला गटातील खुल्या कबड्डी सामन्यांना खेळाडू-क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट
स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार जयंतीनिमित्त बल्लारपूरमध्ये भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन
बल्लारपूर :_ जिल्ह्यात खेळाडूंसाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक क्रीडा सुविधांमुळे युवकांना योग्य दिशा मिळत असून, क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळत आहे. बल्लारपूर येथे आयोजित स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार जयंतीनिमित्त बल्लारपूरमध्ये भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजनामुळे कबड्डी सारख्या देशी खेळांच्या माध्यमातून समाजात संघभावना, सामूहिकता, शिस्त व क्रीडावृत्ती निर्माण होत असून, क्रीडा स्पर्धा हे सामाजिक ऐक्य बळकट करणारे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
हौशी जिल्हा कबड्डी असोसिएशन चंद्रपूर (ग्रामीण/शहर) व आमदार सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार चषक अंतर्गत भव्य जिल्हास्तरीय पुरुष व महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दि. २४, २५ व २६ जानेवारी रोजी बल्लारपूर येथील दादाभाई नौरोजी वार्ड, सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र परिसरात पार पडलेल्या या स्पर्धांना खेळाडू व क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पुरुष गटातील २० तर महिला गटातील १० संघांनी सहभाग नोंदवून स्पर्धांना चुरशीचे स्वरूप प्राप्त झाले.
या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, कबड्डी स्पर्धेचे आयोजक श्रीकांत आंबेकर, समीर केने, निलेश खरबडे, काशीनाथ सिंग, मनीष पांडे, मुन्ना ठाकूर, गोगी दारी, राजू अंचूरी, संजय मोप्पिडवार, प्रकाश दोतपल्ली, राकेश सिंग, ब्रिजभूषण पाझारे, सचिन कुकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, जिल्ह्यात खेळाडूंसाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक क्रीडा सुविधांमुळे युवकांना योग्य दिशा मिळत असून, क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळत आहे. ग्रामीण व शहरी भागातील युवकांना दर्जेदार मैदान, प्रशिक्षण व स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध होत असल्याने त्यांच्या क्रीडा कौशल्यांचा विकास होत आहे. क्रीडेमुळे युवकांमध्ये शिस्त, चिकाटी, सांघिक भावना व सकारात्मक स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होत असून, समाजघडणीमध्ये क्रीडा महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
कबड्डी सारख्या देशी खेळांच्या माध्यमातून समाजात संघभावना, सामूहिकता, शिस्त व क्रीडावृत्ती निर्माण होते. क्रीडा हे सामाजिक ऐक्य बळकट करणारे प्रभावी माध्यम असून, अशा स्पर्धांमुळे युवकांना स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळते, तसेच आरोग्यदायी व सुदृढ समाज निर्मितीस चालना मिळते.
पुढे म्हणाले, महिला सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात येत असून एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माध्यमातून ६२ अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देणारे उपकेंद्र उभे राहत आहे. तसेच स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून महिलांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचे कार्य सुरू असल्याचेही आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले.
आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार
या प्रसंगी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पलक दीपक यादव (बॅडमिंटन खेळाडू), जिवीका योगेश मडावी (राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा पुरस्कारप्राप्त), दिपक सौदागर (बेस्ट क्रिकेटर) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सुरज नैताम यांची वर्धा पोलीस कारागृहात स्पोर्ट्स कोट्यातून निवड झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कबड्डी स्पर्धेत विजेतेपद आणि उपविजेता संघ
कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात चंद्रपूर साईबाबा क्रीडा मंडळ संघाने विजेतेपद पटकावले, तर चंद्रपूर टागोर संघ उपविजेता ठरला. महिला गटात जय भवानी क्रीडा मंडळ, डोरवासा संघ विजेता ठरला, तर क्रीडा मंडळ, पठाणपुरा संघ उपविजेता ठरला.



