मंगल कार्यालयाची घाण रस्त्यावर
घाणीचे साम्राज्य ; नागरिक त्रस्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव मही परिसरात असलेल्या मंगल कार्यालयातील घाण रस्त्यावर आल्याने मंडपगाव ग्राम पंचायत चे सरपंच ,सचीव व ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे, मंडपगाव सरपंच सचिन कदम, सचिव अनिल वैद्य यांनी याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी,अंढेरा पोलीस स्टेशन, देऊळगाव राजा पोलीस स्टेशन यांना तक्रार निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,महामार्गावर असलेल्या गोपी माधव लॉन, विजयाशांती लॉन,तृप्ती लॉन,या मंगल कार्यालयामुळे परिसरातील नागरिकांचे जीवन अक्षरशः त्रस्त झाले आहे.मंडपगाव येथे दिनांक 17 सप्टेंबर रोजी ग्रामसभा संपन्न झाली, यामध्ये सरपंच सचिव व ग्रामस्थ यांनी तक्रार निवेदन दिले,यावेळी सांगण्यात आले मंगल कार्यालयात विवाहसोहळे, वाढदिवस समारंभ आणि इतर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत आहे.
परन्तु त्या नंतर निर्माण होणाऱ्या कचर्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने रस्त्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मंगल कार्यालयातून उरलेले जेवण, डिस्पोजल प्लेट्स, प्लास्टिकच्या बाटल्या, तसेच इतर अवशेष सरळ रस्त्याच्या कडेला टाकले जात आहेत. त्यामुळे आजू बाजूला दुर्गंध पसरला त्या दुर्गंधीने नागरिकांचा श्वास घेणेही अवघड झाले आहे. डास-माशा, भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे परिसरात रोगराई पसरली आहे.स्थानिक रहिवाशांनी अनेकदा याबाबत तक्रारी केल्या मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने नागरिकांच्या रोषाला ऊत आला आहे. “प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे आम्हाला अस्वच्छतेच्या वातावरणात राहावे लागत आहे. मुलांच्या आरोग्याला सर्वाधिक धोका आहे,” असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
संबंधित प्रशासनाने कार्यालयांवर तातडीने दंडात्मक कारवाई करावी, तसेच मंगल कार्यालयाने स्वच्छतेसाठी नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. अन्यथा नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या निष्काळजीपणाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
नागरिकांचे स्पष्ट मत आहे “समारंभानंतर आनंद राहतो पण त्यानंतरची घाण आम्हाला नकोय!”
यावेळी सरपंच सचिन कदम,सचिव अनिल वैद्य, नरहरी देशमुख,गोपाल देशमुख, विष्णु देशमुख, रफिक पठाण,एझार पठाण, साजिद पठाण, गोपाळ देशमुख, पांडुरंग देशमुख, समीर पठाण, अजहर पठाण दीपक कदम,यांच्या सह इतर गावकरी पुरुष, महिला युवक उपस्थित होते.