सेवा पंधरवड्यात नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ _ पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
पालकमंत्र्यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे उद्घाटन : पात्र लाभार्थ्यांना पट्टे व विविध लाभाचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पालकमंत्र्यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे उद्घाटन : पात्र लाभार्थ्यांना पट्टे व विविध लाभाचे वितरण
पंधरवड्यात मिळणार विविध योजनांचा थेट लाभ
सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावा, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत जिल्ह्यात सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या पंधरवड्यात विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॅा.पंकज भोयर यांनी केले.
विकास भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित सेवा पंधरवड्याचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, तहसिलदार संदीप पुंडेकर, सुनील गफाट, सरपंच वैशाली गौळकर आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या वहिवाटीचे रस्ते, पांदनरस्त्यांना नंबर देऊन येणाऱ्या काळात हे सर्वच रस्ते मजबूत करण्यात येणार आहे. रस्ते मजबुतीकरणाच्या कामास सुरुवात देखील झाली आहे. राज्य शासनाने ग्रामीण वहिवाटीच्या रस्त्यांसाठी चांगला निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार व्यक्त करावे तेवढे कमीच आहे, असे पालकमंत्री डॅा.भोयर म्हणाले.
अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या परंतू जागा नावावर नसलेल्या नागरिकांना जमीनीचे पट्टे वाटपाचा व्यापक कार्यक्रम आपण हाती घेतला आहे. 1 हजार 200 पट्टे सेवा पंधरवडा दरम्यान वाटप केले जाणार आहे. त्यामुळे हक्काच्या जागेवर हे लाभार्थी आपले पक्के घर बांधू शकतील. 17 सप्टेंबर ते दिनांक 2 ऑक्टोंबर पर्यंत विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील आवश्यक कागदपत्रांसह पंधरवड्याच्या शिबिरात विकास भवन येथे भेट द्यावी. विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी येथे उपस्थित राहून नागरिकांना सेवा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सेवा पंधरवड्यात विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना एकाच छताखाली मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. नागरिकांना जमीनीचे पट्टे दिले जाणार आहे तसेच गावनिहाय पांदनरस्त्यांचे नकाशे तयार करण्यास या दरम्यान प्राधान्य दिले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी सांगितले. अतिक्रमन असलेल्या जागेवरील लाभार्थ्यांना आता खऱ्या अर्थाने मालकी हक्क मिळणार असल्याने त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी मदत होणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण म्हणाले.
लाभार्थ्यांना पट्टे व विविध लाभाचे वितरण
यावेळी पालकमंत्र्यांच्याहस्ते 219 लाभार्थ्यांना जमीनीचे पट्टे देण्यात आले. तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना अनुदान, जखमी व्यक्ती, पशुधन हाणी व शेतपिक नुकसानीसाठी मदतीचे वितरण करण्यात आले. स्वामित्व योजनेंतर्गत सनद वाटप, पांदन रस्ता योजनेंतर्गत गाव नकाशे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य विकास सन्मान योजना, पंडित दीनदयाळ स्वयं योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, शबरी आवास योजना व रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना विविध प्रकारचा लाभ, धनादेशाचे वितरण करण्यात आले.
विकास भवन येथे विविध विभागाचे 22 स्टॅाल
सेवा पंधरवड्या दरम्यान नागरिकांना विविध योजना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी 22 विभागांचे स्टॅाल लावण्यात आले आहे. या विभागांच्या योजनांची माहिती सोबतच थेट लाभ देखील उपलब्ध करून दिल्या जाणारआहे. दि.2 ऑक्टोंबर पर्यंत स्टॅाल नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. त्याठिकाणी संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी देखील राहणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार संदीप पुंडेकर यांनी तर संचलन नायब तहसिलदार अजय धर्माधिकारी व रेणूका रोटकर-रासपायले यांनी केले. कार्यक्रमास नागरिक, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.