सीसीटीव्हीच्या नजरकैदेत मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा
गोंडपिपरी येथील परीक्षा केंद्रावर २७ कॅमेऱ्यांची नजर ; कॉपीमुक्त परीक्षेचे वातावरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या वतीने चालू असलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा आता सीसीटीव्हीच्या नजरकैदेत पार पडत असून, गोंडपिपरी येथील कला वाणिज्य महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षा केंद्रावर तब्बल सत्तावीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असल्याने कॉपीबहाद्दर परीक्षार्थींना एकप्रकारे शिक्षाच झाली आहे.
गोंडपिपरी येथील कला वाणिज्य महाविद्यालयात अनेक वर्षांपासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे परीक्षा केंद्र सुरू आहे. या परीक्षा केंद्रावर बी. ए., बी. कॉम., एम. ए., एम. कॉम.
अशा विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा पार पडतात. परीक्षेत हमखास पास होण्याची खात्री देणारे परीक्षा केंद्र म्हणून या केंद्राची दूरवर ख्याती होती. मात्र, यावर्षी विद्यापीठाच्या वतीने परीक्षा केंद्रावर तब्बल सत्तावीस कॅमेऱ्यांची नजर असल्याने, कॉपिबहद्दर परीक्षार्थींची पुरती गोची झाली आहे.
आजघडीला या परीक्षा केंद्रावर एकूण १५०० परीक्षार्थी परीक्षा देत असून, गोंडपिपरी तालुक्यासह पोंभुर्णा, बल्लारपूर, राजुरा, चंद्रपूर अशा विविध तालुक्यातील परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. विशेष म्हणजे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असल्याने परीक्षा मंडळाच्या भरारी पथकाचा त्रास कमी झाला असून, स्थानिक परीक्षा नियंत्रकाचा ताणही कमी झाल्याचे दिसून येत आहे
*पोलिस विभागाची डोकेदुखी थांबली*
शिक्षण विभागाच्या परीक्षा म्हटलं की पोलीस विभागाला नेहमीच सतर्क राहून कॉपी करणाऱ्यांवर आणि कॉपी करण्याकरिता मदत करणाऱ्यावर नेहमीच करडी नजर ठेवावी लागते. मात्र, मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असल्याने पोलिस विभागाची होणारी डोकेदुखी थांबली आहे. ज्यामुळे पोलीस विभागाला इतर तक्रारी आणि घटनांचा निपटारा करण्यास पुरेसा वेळ मिळत आहे.
*कॉपीबहाद्दरांना “जोर का झटका..!*
गोंडपिपरी येथील मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा केंद्राची अनेक परीक्षार्थींनी निवड केली होती. मात्र, परीक्षेच्या काळात विद्यापीठाने परीक्षा केंद्रावर तब्बल सत्तावीस सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असल्याने, विद्यापीठाने परीक्षार्थींना “जोर का झटका..!”, दिल्याने अनेक “मातब्बर” परीक्षार्थींना डोके धरून बसावे लागत आहे.
*विद्यापीठाचा निर्णय कौतुकास्पद*
प्रत्येक वर्षी परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत होते आणि त्याकरिता विविध प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागत होत्या. मात्र, यावर्षी विद्यापीठाच्या वतीने परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आल्याने कॉपी करणाऱ्यांवर करडी नजर राहत असून, कॉपी करण्याचे प्रमाण पूर्णपणे बंद झाले आहे. विद्यापीठाचा हा निर्णय कौतुकास्पद असून, अभ्यासू परीक्षार्थींना याचा खूप मोठा फायदा होत आहे.
*प्रा. श्रीनिवास तावाडे, केंद्र संयोजक*
*य.च.म.मु.वि., केंद्र_गोंडपिपरी*



