ताज्या घडामोडी

पुर्वशाचे दोन्ही गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात – जंगलातून पळून जाताना केली अटक

राजुरा पोलिसांचे मोठे यश - हत्येसाठी वापरलेले देशी पिस्तुल व गोळ्या जप्त

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

रविवार दिनांक 23 जुलै रोजी रात्री 8:30 वाजताच्या दरम्यान राजुरा शहरातील सोमनाथपूर वॉर्ड येथिल रहिवासी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे ह्यांच्या घरी झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपींना राजुरा पोलिसांनी अवघ्या काही तासात पळुन जात असताना अटक केली. गोळीबारात सचिन डोहे ह्यांची पत्नी पुर्वशा ह्यांचे जागीच निधन झाले तर लल्ली शेरगील नामक इसमाच्या पाठीत गोळी लागल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले असुन त्याचेवर उपचार सुरू आहेत

प्राप्त माहितीनुसार लल्ली शेरगील नामक युवकाचे सोमनाथपूर परिसरात राहणाऱ्या एका युवकाशी जुने वैमनस्य होते. त्यांच्यात यापूर्वीही संघर्ष व मारझोड झाली होती. काही कारणांवरून ह्या दोघांत पुन्हा बिनसल्याने लल्ली शेरगील ह्याचा काटा काढण्याची योजना तो युवक करत होताच. रविवार दिनांक 23 जुलै रोजी दोघांत पुन्हा संघर्ष निर्माण झाला असता त्या युवकाने लल्ली वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता लल्ली पळत डोहे ह्यांच्या आवारात शिरला नेमक्या त्याच वेळी सचिन डोहे ह्यांच्या पत्नी पुर्वशा डोहे घरातून बाहेर आल्या. दरम्यान आपली शिकार निसटत असल्याचे बघुन मारेकऱ्यांनी देशी कट्ट्याने गोळीबार केला.

झालेल्या गोळीबारात लल्ली शेरगील ह्यांच्या पाठीत एक गोळी शिरली तर दुसऱ्या गोळीने अचानक बाहेर आलेल्या पुर्वशा डोहे ह्यांच्या हृदयाचा वेध घेतला. गोळी लागताच पुर्वशा तिथेच कोसळून गतप्राण झाल्या तर लल्ली शेरगील गंभीर जखमी झाला. दोघांनाही तत्काळ उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल करण्यात आले असता पुर्वशा डोहे ह्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहिर केले तर अत्यवस्थ लल्ली शेरगील ह्याला शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले. तिथे त्याचेवर शस्त्रक्रिया करून गोळी काढण्यात आली असुन प्रकृती स्थिर असल्याचे कळले आहे.

घटनेची माहिती कळताच राजुरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठुन चौकशी सुरू केली तर दुसऱ्या चमूने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवली. परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नागरगोजे ह्यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी ह्यांचे नेतृत्वातील डी बी पथकाने तत्काळ तपास हाती घेऊन मारेकऱ्यांचा शोध घेणे सुरू केले. अवघ्या काही तासांच्या शोध मोहिमेनंतर सपोनी धर्मेंद्र जोशी ह्यांच्या चमूला नवज्योत सिंह व तो अल्पवयीन हे दोघेही गोळीबार करून जंगलाच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पाठलाग करून दोन्ही आरोपींना अटक केली.

पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता त्यांचेकडून घटनेत वापरण्यात आलेला देशी कट्टा, मॅगझिन मधील 3 गोळ्या आढळून आल्या तर घटना स्थळावरून न चालवलेल्या दोन गोळ्या व चालविण्यात आलेल्या दोन गोळ्यांचे शेल जप्त करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कारवाईनंतर दोन्ही आरोपींवर भादंवी च्या कलम 302, 307, 34 व अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 3/25 अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.

ह्या प्रकरणातील मुख्य आरोपी नवज्योत सिंह ह्याचेवर पोलिसांत गुन्हे दाखल असुन यापूर्वीही दोन वेळा अवैध घातक शस्त्रास्त्रे बाळगल्या प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली होती तर नांदेड जिल्ह्यातही त्याच्यावर गुन्हा नोंद असल्याची खात्रीलायक माहिती चांदा ब्लास्टला प्राप्त झाली आहे. तर दुसरा आरोपी अल्पवयीन असल्याची चर्चा आहे. राजुरा पोलिसांनी धडक कारवाई करून अवघ्या काही तासातच रात्रीच्या वेळी आरोपींना अटक केल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे नागरिकांनी कौतुक केले आहे.

 

विशेष नम्र विनंती – बातमी कॉपी करणाऱ्यांनी निदान एका तासाने बातमी कॉपी करावी ही विनंती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये