नंदोरी गावातील अर्धवट पुलाचे काम पूर्ण करा : अन्यथा शिवसेनेचे आंदोलन – सुरज शहा
ठेकेदार व अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करावी : तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील नंदोरी ग्रामपंचायत अंतर्गत इंदिरानगर परिसरातील नागरिकांना आजही पुलाच्या अभावामुळे प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. शाळेत जाणारी लहान मुले असोत की गंभीर रुग्ण पावसाळ्यात नदी पार करून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. हा प्रश्न आता नागरिकांच्या जगण्या-मरण्याचा बनला आहे.
नागरिकांच्या या ज्वलंत प्रश्नासाठी २०१८ साली चांदा ते बांदा योजनेत पुल बांधण्याचे काम सुरू झाले होते. मात्र भ्रष्टाचाराच्या काळ्या पंजात अडकून ते काम अपूर्णच राहिले! आजही नागरिकांना जैसे थे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या अन्यायाविरुद्ध शिवसैनिक रस्त्यावर उतरले असुन संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तात्काळ चौकशी व कठोर कारवाई करावी, अपुरे राहिलेले पुलाचे काम पूर्ण का झाले नाही याची चौकशी करून उत्तर द्यावे तसेच नागरिकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेला जबाबदार धरले जावे अश्या मागण्या तहसील कार्यालय भद्रावती येथे तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहे.
सात दिवसात या संपूर्ण मागण्या पूर्ण न झाल्यास, शिवसेनेच्या वतीने समस्त पीडित नागरिकांना घेऊन तहसील कार्यालयासमोर आंदोलन उभारले जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असेही निवेदनात म्हटले आहे.
हे निवेदन शिवसैनिक सुरज भाऊ शाहा यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा शिवसैनिक सुमित हस्तक यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवा शिवसैनिक निलेश उरकुळे यांच्या नेतृत्वात तहसीलदार साहेबांना देण्यात आले.
यावेळी उपतालुका प्रमुख सिंगलदीप पेंदाम, चंदू मडावी, रवींद्र वाटेकर, संदीप नागपुरे, कादर खान पठाण, रेखा ताजने, संगीता शिवरकर व समस्त नंदोरीवाशी उपस्थित होते.