श्री व्यंकटेश महाविद्यालयात विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री व्यंकटेश महाविद्यालय नेहमी विद्यार्थ्यांसाठी, खेळाडूंसाठी नवनवीन संधी उपलब्ध करून देत असते. ग्रामीण भागातील खेळाडूंनी या संधीचं सोनं करावं, असे आवाहन सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती पुरस्कृत व श्री व्यंकटेश महाविद्यालय आयोजित पुरुष गटासाठीच्या आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे व श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त व महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांची विशेष उपस्थिती होती. उद्घाटन समारंभासाठी अध्यक्ष म्हणून वाणिज्य विभागप्रमुख डॉ. नरेंद्र शेगोकार उपस्थित होते.l
श्री व्यंकटेश महाविद्यालयास टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल डॉ. शशिकांत खेडेकर यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी मनोगत व्यक्त करताना चिकाटी, तंत्रशुद्धपणा व कौशल्य पणाला लावून स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यास आपल्याला हमखास यश मिळते, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. नरेंद्र शेगोकार यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
पुरुष गटामध्ये आयोजित या आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेच्या ए झोन मध्ये अमरावती विभागातील एकूण १२ संघांनी सहभाग नोंदवला. यापैकी श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव संघाने विजेतेपद व बाबासाहेब नाईक कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुसद या संघाने उपविजेतेपद पटकावले.
पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करून विजेत्या व उपविजेत्या गटाला सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. स्पर्धेमध्ये रेफरी म्हणून जबाबदारी पार पाडल्याबद्दल संजय सस्तकर व शहजाद खान यांचा देखील सन्मान करण्यात आला.
पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक नंदन खेडेकर, सामाजिक कार्यकर्ते शरद डोईफोडे व राजे विजयसिंह जाधव यांची उपस्थिती होती. पारितोषिक वितरणाचे अध्यक्षपद प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी भूषविले. उद्घाटन समारोहाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती ढोकले यांनी तर समारोप समारंभाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा संयोजक शारीरिक शिक्षण संचालक डॉ. किरण मोगरकर यांनी केले.
आभार प्रदर्शन डॉ. गजानन तांबडे यांनी केले. या स्पर्धेसाठी स्पर्धक, संघ व्यवस्थापक विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते