एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात शिक्षकांचा गौरव
शिक्षक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

चांदा ब्लास्ट
एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारात 10 सप्टेंबर रोजी शिक्षकांच्या सन्मानार्थ विद्यार्थिनींकडून भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमात प्राध्यापकांकरिता विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
भारताचे द्वितीय राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त 5 सप्टेंबर देशभरात शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो मात्र यावर्षी सलग सुट्ट्यांमुळे महिला विद्यापीठात शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन 10 सप्टेंबर ला करण्यात आले.
या आयोजनाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्राध्यापकांच्या पारंपारिक वेशभूषा.प्राध्यापकांनी भारतातील विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे पोशाख परिधान करून कार्यक्रमात सहभाग घेतला,या मध्ये सह. प्राध्यापक ऋग्वेद खंगमपट्टीवार व सह प्राध्यापिका नेहा गिरडकर यांनी पंजाबी व दक्षिण भारतीय पोशाख परिधान करून सर्वोत्तम पोशाख चा मान मिळविला.
नैना निषाद,रंजना, सदफ इत्यादी विद्यार्थिनींनी कविता, गाणी, नृत्य व मनोगताच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने शिक्षकांचे आभार व्यक्त केले. या प्रसंगी शिक्षकांना भेट म्हणून झाडांची रोपटी देण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन बीसीए (तृतीय वर्ष)च्या विद्यार्थिनी प्रिया व दीपिका यांनी केले.
शिक्षक हे समाज निर्मितीचा कणा असतात तेव्हा विद्यार्थ्यांनी कायम शिस्तीने त्यांच्या निर्देशांचे पालन करावे असे प्रतिपादन संचालक डॉ.राजेश इंगोले यांनी केले व कार्यक्रमाच्या सफल आयोजनासाठी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या,या प्रसंगी आवाराचे संचालक डॉ.राजेश इंगोले,सहायक कुलसचिव डॉ.बाळू राठोड, समन्वयक डॉ.वेदानंद अलमस्त सह समस्त प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा शेवट स्नेहभोजनाने करण्यात आला.