ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संविधान दिनानिमित्त अंतरगाव येथे भारतीय संविधानावर व्याख्यान

अॅड. बोधी रामटेके आणि अॅड. दीपक चटप यांचे मार्गदर्शन; युवकांचा उत्स्फूर्त पुढाकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर : भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने संविधान दिनानिमित्त मौजा अंतरगाव (बु.), पानदेव चौक येथे ‘भारतीय संविधान’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. युथ इमर्जन्सी सर्व्हिस, अंतरगाव (बु.) यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला नागरिक, युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंतरगावच्या सरपंच सौ. निता नवीन वाघमारे होत्या, तर उद्घाटक म्हणून आशिष बाबुराव मुसळे उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे अॅड. बोधी रामटेके आणि अॅड. दीपक चटप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रा. पंकज वनकर यांनी प्रास्ताविकातून संविधान दिनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा भक्कम आधार असून, प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेचा अधिकार प्रदान करणारा अमूल्य दस्तऐवज आहे, असे त्यांनी नमूद केले.

प्रमुख वक्ते अॅड. बोधी रामटेके आणि अॅड. दीपक चटप यांनी भारतीय संविधानाची निर्मिती, संविधानाचे महत्त्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान, नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्ये तसेच संविधानातील लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि समतेच्या मूल्यांवर सविस्तर प्रकाश टाकला. संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले असून, त्याचे संरक्षण करणे आणि संविधानिक मूल्यांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून अधोरेखित केले.

कार्यक्रमाला उपसरपंच अंकित वडस्कर, प्रभावती वडस्कर, शारदा सुर, वैशाली कांबळे, मंगला सातघरे, नितीन मडावी (पोलीस पाटील) यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दीक्षा वाघमारे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी युथ इमर्जन्सी सर्व्हिसचे अध्यक्ष तथा उपसरपंच अंकित वडस्कर यांच्या नेतृत्वाखाली आकाश चिकाटे, गौरव बदखल, गौरव बावणे, शिवाजी लेडगुरे, निलेश गुरनुले, बावणे, कृष्णा उरकुडे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये