ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नायलॉन मांजाच्या वापरावर सक्त मनाई : भद्रावती तहसील कार्यालयाचा जनजागृती संदेश!

मांजा वापरताना आढळल्यास २५ हजारांचा दंड : साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर २ लाख ५० हजारांच्या दंडाची तरतूद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ पतंग उडविण्याच्या आनंदात पक्षी, प्राणी, नागरिक तसेच पर्यावरणाच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन मांजाच्या वापरावर आता प्रशासनाने सक्त मनाई केली आहे. मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांच्या निर्देशानुसार नायलॉन मांजाचा वापर, विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा जनजागृती संदेश भद्रावती तहसील कार्यालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे.

नायलॉन, प्लास्टिक अथवा कृत्रिम सिंथेटिक धाग्यापासून तयार केलेला मांजा वापरणे, विक्री करणे तसेच त्याची साठवणूक करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नायलॉन मांजामुळे पक्ष्यांचे पंख व पाय अडकून त्यांचा मृत्यू होण्याच्या घटना घडतात. तसेच दुचाकीस्वार, पादचारी आणि लहान मुलांच्या गळ्याला मांजा अडकून गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा मांजा केवळ पक्ष्यांसाठीच नव्हे, तर मानवी जीवितासाठीही धोकादायक ठरत आहे.

प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, नायलॉन मांजाचा वापर करताना आढळल्यास संबंधित व्यक्तीला प्रत्येक दोषासाठी २५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलांकडून असा वापर झाल्यास संबंधित पालकांकडून दंड वसूल केला जाऊ शकतो. तर नायलॉन मांजाची साठवणूक किंवा विक्री करताना आढळल्यास विक्रेत्याला प्रत्येक दोषासाठी २ लाख ५० हजार रुपये दंडाची तरतूद असल्याचे जनजागृती पत्रकात नमूद करण्यात आले आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्रीविरोधातही कारवाई केली जाणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी पतंग उडविताना नायलॉन मांजाचा वापर पूर्णपणे टाळावा, तसेच दुकानदारांनी अशा मांजाची विक्री व साठवणूक करू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाकडून कठोर कारवाई होऊ शकते, असा इशाराही या माध्यमातून देण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये