ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्मार्ट प्रकल्पाची कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा; प्रकल्प संचालकांचे निर्देश

जिल्ह्यातील समुदाय आधारित संस्थांच्या कामकाजाचा घेतला आढावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या जागतिक बँक अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात कृषी व्यवसाय विकास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सन २०२०-२१ ते २०२६-२७ या कालावधीतील या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPC) आधुनिक पायाभूत सुविधा, प्रक्रिया यंत्रसामग्री आणि कृषी व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत वर्धा जिल्ह्यात मंजूर झालेल्या समुदाय आधारित संस्थांचा (CBOs) पुणे येथील प्रकल्प संचालक प्रदीप चंद्रन यांनी सविस्तर आढावा घेतला. प्रलंबित आणि सुरू असलेली सर्व कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते.

स्मार्ट प्रकल्पांतर्गत जिल्ह्यासाठी कृषी विभागाचे १०, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे (MSLRM) १० आणि MAVIM चे ३ असे एकूण 23 प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना एकूण ११ गोदामे मंजूर असून त्यांची एकत्रित साठवण क्षमता ७,३९० मेट्रिक टन आहे, धान्य स्वच्छता व प्रतवारीसाठी १८ क्लिनिंग व ग्रेडिंग युनिट, १० डाळ मिल, ३ हळद प्रक्रिया युनिट, प्रत्येकी ६० मेट्रिक टन क्षमतेचे ६ वजनकाटे (वेईब्रिज), २० KVA क्षमतेचा एक रूफटॉप सोलर प्रकल्प, कस्टम हायरिंग सेंटर, कृषी वाहने तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे.

या दौऱ्यात प्रकल्प संचालकांनी सेलू तालुक्यातील केळझर फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड येथे प्रत्यक्ष भेट देऊन प्रकल्पाच्या कामांची पाहणी केली आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रगतीचा आढावा घेतला. ज्या संस्थांची कामे संथगतीने सुरू आहेत, त्यांनी कामांना वेग द्यावा, मशिनरी संपादन प्रक्रिया, अनुदान मागणी प्रस्ताव आणि प्रकल्पाची माहिती ‘एमआयएस’ (MIS) प्रणालीवर अद्ययावत करण्याचे काम तात्काळ पूर्ण करावे, एक्झिट पॉलिसी भरण्याची कार्यवाही तसेच प्रलंबित आणि सुरू असलेली सर्व कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.

या आढावा बैठकीस विभागीय नोडल अधिकारी प्रज्ञा गोळघाटे, जिल्हा अंमलबजावणी कक्ष प्रमुख तथा आत्माचे प्रकल्प संचालक अरविंद उपरीकर, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा नोडल अधिकारी रोहन झांजरे यांच्यासह विविध यंत्रणांचे जिल्हास्तरीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तसेच उमेद, माविम, कृषी विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये