ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नायलॉन मांजा बंदी व जनजागृती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पतंगबाजीचा आनंद साजरा करताना वापरण्यात येणारा नायलॉन (चायनीज) मांजा हा मानवी जीवनाबरोबरच पर्यावरणाच्या दृष्टीनेही अत्यंत घातक ठरत आहे. या धोकादायक मांजामुळे दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो, तर अनेक नागरिकांना गंभीर जखमा होतात. विशेषतः दुचाकीस्वारांच्या गळ्याला अथवा शरीराच्या इतर भागांना मांजा गुंतून गंभीर अपघात व दुखापर्तीच्या घटना घडतात आणि रस्त्यावरून चालणाऱ्यांसाठीही हा मांजा जीवघेणा ठरू शकतो. नायलॉन मांजा हा सहज नष्ट न होणाऱ्या कृत्रिम घटकांपासून बनवलेला असल्याने तो दीर्घकाळ पर्यावरणात राहतो. झाडांवर, विद्युत तारांवर, इमारतींवर तसेच सार्वजनिक ठिकाणी अडकलेला मांजा पक्ष्यांसह मानवासाठीही प्राणघातक ठरतो, ज्यामुळे जैवविविधतेची हानी होऊन पर्यावरणीय समतोल बिघडतो.

नायलॉन मांज्याच्या वापरावर मा. मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांनी स्वतःहून दखल घेत (एस.एम.पी.एल. क्र. ०१/२०२१ अन्वये) दि. १२.०१.२०२६ रोजी कडक आदेश पारित केले आहेत. या आदेशानुसार नायलॉन मांज्याची विक्री आणि वापर याबाबत अत्यंत कठोर भूमिका घेण्यात आली असून, नायलॉन मांजा वापरून पतंग उडवताना आढळल्यास संबंधित व्यक्तीकडून रु. २५,०००/- दंड आकारण्यात येईल. अल्पवयीन मुले नायलॉन मांजा वापरताना आढळल्यास त्यांच्या पालकांकडून दंड वसूल केला जाईल. तसेच नायलॉन मांज्याची विक्री करताना विक्रेते किंवा दुकानदार आढळल्यास त्यांच्याकडून रु. २,५०,०००/- इतका दंड वसूल करण्यात येईल. दंडाची रक्कम भरण्यास कुचराई किंवा टाळाटाळ केल्यास जमीन महसूल पद्धतीनुसार वसुली करण्यात येईल व प्रत्येक गुन्ह्यासाठी स्वतंत्र दंड आकारला जाईल.

नायलॉन मांज्याची साठवणूक, विक्री किंवा वापर सुरू असल्याचे कोणाच्याही निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अथवा वर्धा पोलीस नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन क्रमांक ८८८८३३८३५४ यावर फोनद्वारे किंवा व्हॉट्सअॅप मॅसेजद्वारे किंवा ११२ या क्रमांकावर तत्काळ माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव व ओळख पूर्णपणे गोपनीय राखली जाईल. असे आवाहन पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले आहे.

उत्सवाचा आनंद नक्की घ्या; पण कोणाच्याही जीवाची किंमत त्यापेक्षा मोठी नाही!

नायलॉन मांज्याचा वापर न करणे ही केवळ कायदेशीर बाब नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक आणि पर्यावरणीय कर्तव्य आहे. मानवी जीवित, मुके पशुपक्षी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये