चंद्रपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाला ‘चांदा महाकाली’ चित्रपटातून देशव्यापी ओळख मिळणार – आ. जोरगेवार
श्री माता महाकालीच्या महात्म्यावर आधारित मराठी चित्रपटाचा शुभारं, चंद्रपूरच्या श्रद्धा, भक्ती आणि पुरातन इतिहासाची माहिती देशभर पोहोचविण्याचा प्रयत्न

चांदा ब्लास्ट
चंद्रपूरची आराध्य दैवत श्री माता महाकाली यांच्या महात्म्याचा, पुरातन इतिहासाचा आणि चंद्रपूरच्या श्रद्धा, भक्ती व सांस्कृतिक परंपरेचा गौरव करणारा ‘चांदा महाकाली’ हा मराठी चित्रपट निश्चितच चंद्रपूरच्या धार्मिक वैभवाला व्यापक ओळख मिळवून देणारा ठरेल. श्री माता महाकाली मंदिराचा समृद्ध इतिहास आणि मातेच्या महात्म्याची माहिती चित्रपटाच्या माध्यमातून देशभरातील भाविकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे अशा उपक्रमांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
चंद्रपूरची आराध्य दैवत श्री माता महाकाली यांच्या पावन चरणी नतमस्तक होऊन भव्य मराठी चित्रपट ‘चांदा महाकाली’च्या निर्मितीचा शुभारंभ श्री माता महाकाली मंदिर परिसरात करण्यात आला. या मंगलमय सोहळ्याला आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कलाकार तसेच संपूर्ण चित्रपट चमूशी संवाद साधत या उपक्रमाचे स्वागत केले आणि चित्रपटाच्या यशस्वी निर्मितीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, श्री माता महाकाली हे चंद्रपूरकरांचे श्रद्धास्थान असून, लाखो भाविकांची या देवीवर अपार श्रद्धा आहे. चंद्रपूरची ओळख केवळ औद्योगिक शहर म्हणून न राहता येथील धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाची ओळखही देशभर व्हावी, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. चंद्रपूरमधील धार्मिक आणि औद्योगिक पर्यटनाला चालना मिळावी, तसेच जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राचा विस्तार व्हावा, हा या प्रयत्नांमागील मुख्य उद्देश आहे.
श्री माता महाकाली मंदिराचा पुरातन इतिहास, मातेचे महात्म्य आणि भाविकांच्या मनातील श्रद्धा या सर्व बाबींचे दर्शन ‘चांदा महाकाली’ चित्रपटातून घडणार आहे. चित्रपट हे प्रभावी माध्यम असून, त्याच्या माध्यमातून एखाद्या शहराची संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक वारसा दूरवर पोहोचविता येतो. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून चंद्रपूरच्या धार्मिक वैभवाची देशभर ओळख निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
चंद्रपूरच्या पर्यटन विकासासाठी श्री माता महाकाली मंदिर परिसराच्या विकासासह विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. धार्मिक पर्यटनाला चालना मिळाल्यास केवळ मंदिराची ओळख वाढणार नाही, तर जिल्ह्यातील स्थानिक व्यवसाय, रोजगार आणि पर्यटनाशी संबंधित इतर क्षेत्रांनाही त्याचा लाभ होऊ शकतो. अशा पार्श्वभूमीवर श्री माता महाकाली यांच्या महात्म्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती होणे ही चंद्रपूरसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे आमदार जोरगेवार यांनी नमूद केले.
या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेणार्या निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि कलाकारांचे त्यांनी अभिनंदन केले. चंद्रपूरच्या श्रद्धा आणि संस्कृतीला कलात्मक माध्यमातून देशभर पोहोचविण्याचा हा प्रयत्न महत्त्वपूर्ण असून, चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. चित्रपटाची निर्मिती यशस्वीरीत्या पूर्ण होऊन रसिक आणि भाविकांचा भरभरून प्रतिसाद मिळावा, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी श्री महाकाली माता ट्रस्टच्या वतीने चित्रपटातील कलाकार तसेच चित्रपट निर्मितीसाठी सहकार्य करणार्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मंदिर परिसरात आयोजित या सोहळ्यात चित्रपटाच्या संपूर्ण चमूचा उत्साह दिसून आला. यावेळी श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट चे सुनील महाकाले, सदस्या सविता दंढारे, मिलिंद गम्पावार, भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, राष्ट्रीय कार्यकारणी परिषद सदस्य, तुषार सोम, अध्यक्ष किसन मोर्चा संजय बुरघाटे, अध्यक्ष कामगार झोपडपट्टी आघाडी रामकुमार आकापेल्लीवार, युवा नेते रघुवीर अहिर, जेष्ठ नेते अजय जैस्वाल, नगरसेवक आशिष मासीरकर, पुनम तिवारी, सुमित बेले, ईश्वर विरूटकर आदिंची उपस्थिती होती.



