ताज्या घडामोडी
भीषण आगीत दीडशे हून अधिक क्विंटल कापूस जळून खाक!
विदर्भ जिनिंगमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग ; जिनिंग मालकाचे कोट्यवधींचे नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना : तालुक्यातील चनई खुर्द येथील विदर्भ जिनिंगमध्ये शनिवारी (२८ नोव्हेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत तब्बल दीडशे हून अधिक क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची माहिती आहे. आगीमुळे जिनिंगचे मालक सलीम पारेख यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आगीची माहिती मिळताच नगरपंचायत कोरपना येथील अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, जिनिंग मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण शॉर्टसर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे.



