भद्रावतीत संविधान दिन उत्साहात साजरा
संविधान नागरिक संवर्धन समितीचे भव्य आयोजन : विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांची मेजवानी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने संविधान नागरिक संवर्धन समिती, भद्रावती यांच्या वतीने गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुना बस स्टॉप, भद्रावती येथे भव्य संविधान दिन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रात सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत संविधान सकाळ, सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, ग्रुप डान्स, आदिवासी सांस्कृतिक नृत्य, रॅप साँग तसेच विविध प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रील स्टार अमित गणवीर (जीजा-साला), सोशल इन्फ्लुएन्सर मिथिलेश गणगार (नागपूर) आणि रॉकस्टार म्युझिकल अभि (नांदेड) यांनी विशेष आकर्षण निर्माण केले.
सकाळच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सामाजिक कार्यकर्ते ॲड. भूपेंद्र रायपुरे सर यांनी भूषविले, तर उद्घाटन नगरसेविका उर्विलाताई साव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष प्रफुल्लभाऊ चटकी उपस्थित होते. तसेच पोलीस स्टेशन भद्रावतीचे ठाणेदार योगेश्वर पारधी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सायंकाळी भव्य संविधान प्रबोधन सभा
सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत भव्य संविधान प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये भारतीय संविधान, लोकशाही व्यवस्था, सामाजिक परिवर्तन, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि नागरिकांचे घटनात्मक अधिकार या विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
सभेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्राचे विद्रोही कवी व प्रबोधनकार गोविंद पोलाड (अमरावती) उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून ॲड. बोधी रामटेके (गडचिरोली) आणि नागसेन पाझारे सर (भद्रावती) यांनी संविधानाच्या विविध पैलूंवर आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सामाजिक कार्यकर्ते संदीपभाऊ ढेंगळे यांनी भूषविले, तर उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते चंदुभाऊ चंदनखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.
संविधानिक मूल्यांचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प
या संपूर्ण समारोहाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेषतः संविधान प्रबोधन सभेमध्ये वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, संविधानाचे महत्त्व, लोकशाहीचे संरक्षण, सामाजिक समता आणि प्रत्येक नागरिकाच्या घटनात्मक अधिकारांची जाणीव यावर सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची रुजवण समाजातील प्रत्येक घटकात व्हावी, संविधानाबद्दल जनजागृती निर्माण व्हावी आणि नव्या पिढीला संविधानिक विचारांची ओळख व्हावी, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश होता.
आयोजन समितीचे विशेष योगदान
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीतील राजरतन पेटकर, प्रणय कांबळे, वैभव पाटील,पनवेल शेंडे, संकेत चिमुरकर, कृतांत सहारे तसेच समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे सर्व मान्यवर, प्रमुख पाहुणे, वक्ते, कलाकार, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, देणगीदार, स्वयंसेवक आणि उपस्थित नागरिकांचे आयोजन समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
संविधानाचा विचार घराघरांत पोहोचविण्याचा आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीचा संकल्प घेऊन संविधान दन समारोह उत्साहात संपन्न झाला.



