ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कलाजगत : सौंदर्यदृष्टी आणि अंतर्वेदना!

प्रकाशचित्रकार नानू नेवरे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कला उन्मुक्त असते. ती कधी सौंदर्य निर्माण करते, तर कधी उद्विग्नता उघड करते; कधी अस्थैर्य पसरवते, तर कधी समाजालाही प्रश्न विचारते. सौंदर्य व उद्विग्नता या दोन्ही भावना भिन्न असल्या, तरी कलेत त्या एकत्र येऊन अधिक तीव्र आणि थेट परिणाम घडवू शकतात. त्यामुळे कला ही केवळ अभिव्यक्तीसाठी नसून ती विचारांना दिशा देणारी आणि भावनांना स्पर्श करणारी एक सर्जनशील प्रक्रिया आहे.

सौंदर्यदृष्टी आणि प्रकाश-छायेच्या विरोधाभासातून शेतकऱ्यांच्या जीवनातील वास्तव टिपणारा संवेदनशील, सर्जनशील व कृतिशील प्रकाशचित्रकार म्हणून नानू नेवरेंनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नेवरेंनी टिपलेल्या प्रकाशचित्रांत कथानकासोबतच एक सशक्त दृश्यभाषाही आहे. ही चित्रे केवळ कलाकृतीपुरती मर्यादित न राहता त्यांतून सौंदर्याभिरुचीचे ‘आक्रंदन’ प्रकट होते. या आक्रंदनातून एक मूलभूत व मूलगामी मूल्यसंघर्ष अधोरेखित होतो. हा संघर्ष अस्वस्थतेचा वेध घेतो. ही अस्वस्थता माणसाला जागे करते आणि सत्य, संघर्ष व विवेकाकडे पाहायला शिकवते.

कुणावरही, कुठेही अन्याय झाला, तरी नेवरेंच्या संवेदनशील कलामनाला दुःखाच्या हाका ऐकायला येतात. त्या यातनांतून निर्माण झालेली उद्विग्नता आणि कोलाहल प्रकाशचित्रांच्या माध्यमातून नाट्यमयरीत्या प्रकट होऊ लागते. त्यासाठी नेवरे आपल्या कलाकृतींमध्ये नव्या प्रतीकांचा प्रभावी वापर करून, पारंपरिक मिथकांची आधुनिक काळाशी सुसंगत अशी पुनर्मांडणी करतात. जुन्या मिथकांना समकालीन वास्तवाशी जोडून नवा आशय, नवी दिशा आणि व्यापक संदर्भ उपलब्ध करून देतात.

शेतकऱ्यांचे विषण्ण करणारे जगणे आणि त्यांच्या प्रश्नांतून व्यक्त होणारा उद्रेक नेवरेंनी ‘माझा शेतकरी’ या वास्तववादाकडून अतिवास्तववादाकडे जाणाऱ्या ‘कृष्ण-धवल’ प्रकाशचित्र मालिकेतून उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या कलाकृतींचे प्रदर्शन नागपूर येथील शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाच्या कलादालनात भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन ३० तारखेपर्यंत सुरु राहणार असून, सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत कलारसिकांसाठी खुले राहणार आहे.

*• मदर इंडिया*

मातृत्व, त्याग, नीतिमूल्ये आणि स्त्रीशक्ती यांचे प्रतीक असलेल्या मदर ‘इंडिया’ या कलाकृतीतून स्त्रीच्या जीवनातील अस्थिरता आणि प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देण्याची तिची जिद्द प्रभावीपणे व्यक्त होते. कलाकृतीत स्त्रीची संघर्षशील वृत्ती दर्शविण्यासाठी नांगराची प्रतिमा आणि पाण्याच्या लाटांवर बैलगाडीचे चाक एक्सपोज केले आहे. स्त्री प्रतिमा लो-कॉन्ट्रास्ट ॲम्बियंट प्रकाशयोजनेत टिपल्यामुळे टोनल बॅलन्स नियंत्रित आहे. लो-अँगल सिल्हूट आणि पर्सपेक्टिव्ह रचना असलेली ही कलाकृती ‘कन्सेप्च्युअल आर्ट फोटोग्राफी’चा उत्तम नमुना आहे.

*• दुभंग*

शेतकऱ्यांच्या जीवनातील आव्हानांचे प्रतीक म्हणून दुष्काळ आणि महापुराचे प्रभावी चित्रण ‘दुभंग’ या कलाकृतीत करण्यात आले आहे. यातील विस्कटलेल्या जीवनाच्या अर्धवट रेषा, अपूर्ण आकृती आणि छाया-प्रकाशातील ताणतणाव हे शेतकऱ्यांच्या अस्वस्थ वर्तमानामागील आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय घटक कारणीभूत असल्याचे सूचित करतात. विशेषतः शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर ओव्हरलॅप केलेले कोरड्या जमिनीच्या भेगांचे टेक्स्चर, डोळ्यांखालील तीक्ष्ण सावल्या, त्वचेचा पोत आणि पार्श्वभूमीतील पाण्याच्या लहरी यांमुळे प्रतिमेत प्रभावी दृश्यात्मक परिणाम साधता आला. उच्च कॉन्ट्रास्ट आणि डबल एक्स्पोजर या तंत्राच्या साहाय्याने साकारलेली ही पोर्ट्रेट प्रतिमा आशयपूर्ण व आकर्षक आहे.

*• पीस*

सन २०२० मध्ये लागू करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकऱ्यांनी दिल्ली येथे दीर्घकाळ आंदोलन केले. संघर्ष कितीही मोठा असला, तरी शांतता आणि सामंजस्याच्या माध्यमातून विजय मिळवता येऊ शकतो, हा विचार नेवरेंनी दृश्यस्वरूपातून मांडताना शेतकऱ्यांचे जीवन, परंपरा, श्रम आणि संघर्ष यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बैलगाडीच्या चाकावर शांतता, आशा आणि अहिंसेचे प्रतीक असलेले कबुतर चित्रित केले आहे. कलात्मक गुणवत्ता आणि अभिनव दृश्यात्मक मांडणी यांचा सुरेख संगम असलेली ‘पीस’ ही प्रतीकात्मक कलाकृती लक्ष वेधून घेते.

*• कर्णाहुती*

कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर निर्णायक क्षणी कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत फसल्यामुळे विवश झालेल्या कर्णाने आपले शस्त्र खाली ठेवून अर्जुनाकडे युद्धविरामाची याचना केली; मात्र तरीही अर्जुनाने प्रहार केला आणि कर्णाचा वध झाला. महाभारतातील याच प्रसंगावर आधारित नेवरेंनी ‘कर्णाहुती’ कलाकृती साकारली. जमिनीत फसलेल्या बैलगाडीच्या चाकाला बाहेर काढण्यासाठी धडपडणारा वस्त्रविरहित शेतकरी, त्याच्या जगण्यातील संघर्ष आणि एकटेपणा या कलाकृतीत ठळकपणे जाणवतो. जगण्यासाठीच्या संघर्षाची कहाणी सांगणारी ही कलाकृती अंतर्मुख करते.

*• बाप माझा कर्जबाजारी*

नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आणि सततच्या अपमानास्पद जगण्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी अखेर जीवन संपविण्याचा मार्ग निवडतो. याच आशयाला अनुरूप नेवरेंनी साकारलेली बाप ‘माझा शेतकरी’ ही दृश्य अभिव्यक्ती मन सुन्न करणारी आहे. या कलाकृतीत बुजगावण्याच्या प्रतीकातून शेतकरी बापाचे चित्रण केले आहे. बाप जिवंत असूनही मानसिकदृष्ट्या खचलेल्या जन्मदात्याला मृत्यूच्या मार्गापासून परावृत्त करण्यासाठी चिमुकल्या लेकीने बुजगावण्याला घट्ट कवटाळले आहे. भावनिक, कौटुंबिक आणि सामाजिक आशयाचा प्रत्यय देणारी ही हृदयस्पर्शी कलाकृती तंत्रदृष्ट्याही परिपूर्ण आहे.

*• “मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते…”*

कवी सुरेश भट यांच्या रचनेतील ओळींचा संदर्भ घेऊन साकारलेली ही प्रदर्शनातील एकमेव रंगीत कलाकृती आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्यास भाग पाडणारी ही कलाकृती जीवन आणि मृत्यू यांच्या सीमारेषेवरील धूसर अवस्था सूचित करते. या कलाकृतीतील रचना व मांडणीच्या दृष्टीने केंद्रस्थानी असलेले सरण, जळालेली लाकडे, राख आणि पायांची प्रतिमा विषयाच्या गाभ्यापर्यंत पोहचण्यास प्रवृत्त करते. उबदार नारिंगी-लाल रंगछटा, गडद पार्श्वभूमी आणि प्रकाश-छायांतील विरोधाभास यांमुळे वेदना, निराशा, अग्नी आणि अंधार यातील संघर्षाची तीव्रता अधिक प्रभावीपणे व्यक्त होते. सामाजिक वास्तवाचे दाहक प्रतिबिंब दर्शविणारी ही कलाकृती अत्यंत प्रभावी आणि भावगर्भ आहे.

या प्रदर्शनात ‘खेळ मांडीयला’, ‘बालपण’, ‘हिज मास्टर व्हाईस’, ‘मृत्युदार’, ‘टोपीखाली’, ‘भूमिपुत्र’, ‘जागते रहो’, ‘कटपुतली’, ‘अगतिक’, ‘सावकारी काक’, ‘ओला दुष्काळ’ आणि ‘गाव विकणे आहे’ या विषयांवरील प्रकाशचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. या सर्व कलाकृतींतून शेतकऱ्यांविषयीच्या नेवरेंच्या अंतर्मनातील संवेदना, सामाजिक जाणीवा आणि वास्तवाचे भान ठळकपणे व्यक्त झाले आहे.

कलाकृतींमध्ये एकाचवेळी तांत्रिक आणि भावनिक घटकांचा समन्वय साधण्याचे कसब असलेल्या नेवरेंचा सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोन देखील प्रगल्भ आहे. रंगांच्या आकर्षणापलीकडे जाऊन कष्टकऱ्यांच्या जीवनाचा सार मांडण्यासाठी आणि प्रकाशचित्रांना एक विशिष्ट कलात्मक उंची प्राप्त करुन देण्यासाठी त्यांनी सातत्याने काळ्या-पांढऱ्या रंगछटांमध्ये प्रकाशचित्रण केले. किंबहुना, आशा आणि निराशा यांचे प्रतीक असलेल्या या दोनच रंगछटा त्यांच्या प्रकाशचित्रणाचा केंद्रबिंदू राहिल्या आहेत.

एकूणच, नेवरेंनी साकारलेल्या सर्वंच कलाकृतींमधील प्रतीकात्मक घटक, वास्तववादी प्रतिमा, आकारमान, अवकाशविभाजन, पोत, रचनात्मक मांडणी आणि नैसर्गिकता यांच्या प्रभावी समन्वयातून छाया-प्रकाशाचा नियंत्रित आणि कलात्मक वापर केल्यामुळे या कलाकृती केवळ दृश्यदृष्ट्याच नव्हे, तर भावनिकदृष्ट्याही अंतर्मुख करतात.

*आशिष यावले, नागपूर. मो. ९९२२२९००२२

(लेखक उपयोजित कलेचे अभ्यासक आहेत.)

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये