महात्मा फुलेंचे शिक्षणविचार आजच्या आधुनिक युगातही प्रेरणादायी : रवींद्र मुप्पावार
विश्वशांती विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिनी अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून माणसाला विचारशील, विवेकी आणि स्वाभिमानी बनविण्याचे माध्यम आहे, हा त्यांचा दृष्टिकोन होता. आजच्या डिजिटल आणि आधुनिक युगातही शिक्षणासोबत वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक समता आणि मानवता जोपासणे आवश्यक आहे. जात, धर्म, लिंग आणि आर्थिक परिस्थिती यापलीकडे जाऊन प्रत्येकाला शिक्षणाची समान संधी मिळाली पाहिजे. महात्मा फुले यांचे हे विचार आजही समाजाला प्रगती, समता आणि परिवर्तनाची दिशा देणारे दीपस्तंभ आहेत असे अध्यक्षस्थानावरून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार बोलत होते.
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, सावली येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रवींद्र मुप्पावार होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक राजेश झोडे उपस्थित होते. तसेच उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षक राजू केदार, प्रकाश गेडाम, शरदचंद्र पोहनकर,अरुण सातपुते आणि वासंती नागोसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर तसेच त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि स्त्रीशिक्षणविषयक विचारांवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. शेखर प्यारमवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक अंकुश गोहणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



