ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घूस नगर परिषदेत ८५ लाखांच्या कथित भ्रष्टाचाराचे प्रकरण तापले ; मुख्याधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी!

दलित वस्ती विकासकामांमध्ये अडथळे आणि कार्यालयीन वेळेत मुख्यालयात अनुपस्थित राहत असल्याचाही आरोप; जिल्हाधिकारी कार्यालयाने मागविला वस्तुनिष्ठ अहवाल

चांदा ब्लास्ट

घुग्घूस :_ नगर परिषद प्रशासन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. नगर परिषदेचे सभापती रोशन परशुराम पवार यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांनी २६ नोव्हेंबर २०२६ रोजी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून संबंधित प्रकरणांबाबत आवश्यक कागदपत्रांसह वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रात मुख्याधिकाऱ्यांविरोधात तीन प्रमुख मुद्द्यांवर चौकशी व कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याचे नमूद आहे.

प्राप्त पत्रानुसार, पहिला मुद्दा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत कथित ८५ लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. या प्रकरणात मासिक सभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दुसरा मुद्दा सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील दलित वस्ती विकासकामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही विकासकामांमध्ये कथित अडथळे निर्माण केले जात असल्याचा आहे. संबंधित विकासकामांमध्ये अनावश्यक अडथळे आणले जात असल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणातही विभागीय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तिसरा मुद्दा मुख्याधिकारी कार्यालयीन वेळेत मुख्यालयात उपस्थित राहत नसल्याच्या आरोपाशी संबंधित आहे. याबाबतही आवश्यक चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या सर्व प्रकरणांची वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित आवश्यक कागदपत्रांसह वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

आता प्रशासकीय चौकशीकडे नागरिकांचे लक्ष!

जिल्हाधिकारी कार्यालयाने अहवाल मागविल्यानंतर घुग्घूस नगर परिषदेत या आरोपांबाबत चर्चेला उधाण आले आहे. मात्र, पत्रात नमूद करण्यात आलेले आरोप अद्याप चौकशीच्या अधीन असून, त्यांची सत्यता प्रशासकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. आता नगर परिषद प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नगर परिषदेच्या कामकाजातील पारदर्शकता, विकासकामांची गती आणि प्रशासकीय उत्तरदायित्व याबाबत आता जिल्हा प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे घुग्घूसकरांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये