ग्रामपंचायतींना स्वउत्पन्नाचे नवे दार!, शासनाकडून विविध प्रकल्पांना मंजुरी
दुकाने, बाजारपेठ, वाहनतळ, तलाव, बांबू लागवड अन् सौरऊर्जा प्रकल्पांसाठी निधी ; ग्रामसभेची मंजुरी आणि १० टक्के लोकसहभाग आवश्यक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ गावाच्या विकासासाठी प्रत्येक वेळी शासकीय अनुदानावर अवलंबून राहणाऱ्या ग्रामपंचायतींना आता स्वतःचे उत्पन्न निर्माण करण्याची संधी मिळणार आहे. ग्रामपंचायतींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत उत्पन्नवाढीची योजना नियमित स्वरूपात राबविण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे गावातील गायरान जमीन, ग्रामपंचायतींचे तलाव, मोकळ्या जागा आणि बाजारपेठांचा उपयोग करून उत्पन्नाचे कायमस्वरूपी स्रोत निर्माण करण्याचा मार्ग खुला झाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने शासन निर्णय जारी केला असून, ग्रामपंचायतींकडे स्थानिक संसाधने उपलब्ध असतानाही योग्य नियोजन आणि भांडवली गुंतवणुकीअभावी त्यांचा उत्पन्ननिर्मितीसाठी पुरेसा वापर होत नाही, असे शासनाने निर्णयाच्या प्रस्तावनेत नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींनी स्वतःचे उत्पन्न वाढवून स्थानिक नागरी सुविधा आणि विकास आराखड्यांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करावी, यासाठी ही योजना नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
*बांबू लागवड; कुरण विकासालाही मदत*
या योजनेंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रातील गायरान जमीन, सामुदायिक वनहक्क क्षेत्र (CFR) आणि ग्रामपंचायतीच्या मालकीच्या इतर जमिनींवर जनावरांसाठी कुरण विकास, बांबू लागवड तसेच बायोगॅस व जैवइंधन निर्मितीसाठी नेपियर गवताची लागवड करता येणार आहे. बांबू लागवडीसाठी पहिली तीन वर्षे, तर कुरण विकास आणि नेपियर गवत लागवडीसाठी पहिली दोन वर्षे आवश्यक निधी उपलब्ध करून देता येईल. मात्र मजुरीचा घटक रोजगार हमी योजनेतून घेणे बंधनकारक आहे. त्यानंतर देखभाल, दुरुस्ती आणि पुढील लागवडीचा खर्च संबंधित प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नातून करावा लागणार आहे.
*तलावांत मत्स्यउत्पादनाला प्रोत्साहन*
ग्रामपंचायतींच्या मालकीचे तलाव आणि जलाशय आता उत्पन्ननिर्मितीचे साधन बनू शकणार आहेत. या तलावांमध्ये मत्स्यउत्पादन घेण्यासाठी सुरुवातीच्या दोन वर्षांपर्यंत निधी उपलब्ध करून देता येईल. या प्रकल्पातील मजुरी रोजगार हमी योजनेतून घेणे आवश्यक आहे. दोन वर्षांनंतर तलावांची देखभाल, दुरुस्ती आणि पुढील मत्स्यउत्पादनाचा खर्च ग्रामपंचायतीने स्वतःच्या उत्पन्नातून करणे अपेक्षित आहे.
*व्यावसायिक दुकान गाळ्यांसाठी निधी*
ग्रामपंचायतींच्या मालकीच्या जमिनीवर दुकाने, भाडेकरू जागा, हॉटेल आणि व्यावसायिक गाळे विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. मात्र ही तरतूद दोन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी आहे. दोन हजार ते पाच हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना कमाल ३० लाख रुपये, तर पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना कमाल ५० लाख रुपये निधी मिळू शकतो. या मर्यादेपेक्षा अधिक निधी देण्यात येणार नसल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
*पर्यटनस्थळांवरील वाहनतळासाठी ३० लाख*
ग्रामपंचायत क्षेत्रातील किंवा लगतच्या पर्यटनस्थळे आणि तीर्थक्षेत्रांवर येणाऱ्या पर्यटक व भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था उभारता येणार आहे. यासाठी एकदाच कमाल ३० लाख रुपयांपर्यंत निधी उपलब्ध होऊ शकतो. मात्र संबंधित पर्यटनस्थळ किंवा तीर्थक्षेत्राला एका वर्षात किमान एक लाख भाविकांनी भेट दिलेली असणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित पोलीस अधीक्षकांचे प्रमाणित प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
*सौरऊर्जा, बाजारपेठ आणि खतनिर्मितीचेही पर्याय*
ग्रामपंचायतींना सोलर मायक्रोग्रीड आणि हरित ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान देता येणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी अतिरिक्त वीज महावितरण कंपनीशी जोडून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर घालण्याचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे गावातील आठवडी बाजारांसाठी ओटे आणि उत्पन्न मिळवून देणाऱ्या आवश्यक व्यावसायिक सुविधा विकसित करण्यासाठी प्रतिग्रामपंचायत कमाल २५ लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. गावातील घनकचरा आणि शेतीतील अवशेषांपासून कंपोस्ट खत, गांडूळ खत, शेणखत आणि अन्य खतनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठीही पहिल्या दोन वर्षांच्या कालावधीसाठी निधी उपलब्ध करून देता येणार आहे.
*ग्रामसभेची मंजुरी आणि १० टक्के योगदान अनिवार्य*
या योजनेतून निधी मिळविण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी शासनाने निश्चित केल्या आहेत. संबंधित प्रकल्पाला ग्रामसभेची मंजुरी असणे आवश्यक आहे. प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्तावासोबत सविस्तर व्यवहार्यता अहवाल (DPR) सादर करावा लागणार आहे. प्रकल्पासाठी किमान १० टक्के स्थानिक योगदान अपेक्षित असून ते स्वयंश्रम किंवा रोख स्वरूपात देता येईल. संबंधित विभागाच्या सक्षम प्राधिकाऱ्याची तांत्रिक मान्यताही बंधनकारक राहणार आहे. एका ग्रामपंचायतीला प्रत्येक नमूद प्रयोजनासाठी एकदाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.



