ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपुरात राज्यातील पहिला २५१ कुंडीय गायत्री महायज्ञ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती ; आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

चांदा ब्लास्ट

९ ते १२ जानेवारी २०२७ दरम्यान आयोजन

चंद्रपूर :_ गायत्री शक्तिपीठ परिवाराच्या वतीने तसेच आमदार सुधीर मुनगंटीवार आणि सपना मुनगंटीवार यांच्या सहकार्याने चंद्रपूर येथे महाराष्ट्रातील पहिल्या २५१ कुंडीय गायत्री महायज्ञ तथा नशामुक्ती संकल्प समारोहाचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. ९ ते १२ जानेवारी २०२७ या कालावधीत म्हाडा परिसर येथे हा चार दिवसीय आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सव पार पडणार आहे.

या महायज्ञाच्या पूर्वतयारीचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता म्हाडा परिसरातील नियोजित मैदानावर आमदार सुधीर मुनगंटीवार आणि सपना मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ रविवारी आयोजित करण्यात आला आहे. या चार दिवसीय महायज्ञ समारोहाचे विशेष आकर्षण म्हणजे १२ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येणारे २५ हजार युवकांचे भव्य युवा संमेलन. या संमेलनाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून आयोजित या युवा संमेलनातून युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, चारित्र्यनिर्माण, सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण, व्यसनमुक्त जीवनशैली आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान यांची प्रेरणा निर्माण करण्यात येणार आहे.

या महायज्ञाच्या निमित्ताने नशामुक्त भारत अभियानांतर्गत युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आणि स्लोगन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. व्यसनांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्त जीवनशैली आणि निरोगी समाजनिर्मिती याबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.

तसेच गोसंवर्धन संमेलन, कृषी संमेलन, नारी सशक्तीकरण संमेलन, १० हजार युवकांचे भव्य युवा संमेलन, नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, व्यसनमुक्ती संकल्प समारोह, या माध्यमातून शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना एकत्र आणून सामाजिक प्रबोधनाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती गायत्री शक्तिपीठ परिवाराचे निरीक्षक पुरुषोत्तम बंडावार, हरीश शर्मा, डॉ. मंगेश गुलवाडे, बृजभूषण पाझारे, डॉ शैलेन्द्र शुक्ला, सोहम बुटले, छबुताई वेरगाडे यांनी शुक्रवारी येथे पत्रकारपरिषदेत दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये