ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एमआयडीसी विरोधात वातावरण असताना पदयात्रेतून नौटंकी? ; करंजीकरांच्या पदयात्रेवर शेतकरी संघर्ष समितीचा आक्षेप

शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगण्याचे एकता संघर्ष समितीचे आवाहन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ करंजी एमआयडीसीच्या समर्थनार्थ काही स्थानिक गावकऱ्यांकडून करंजी ते गोंडपिपरी तहसील कार्यालयापर्यंत सोमवारी (दि.३०) पदयात्रा काढण्याचे नियोजन आहे. मात्र या पदयात्रेवर शेतकरी एकता संघर्ष कृती समितीने आक्षेप घेतला आहे. या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत शनिवारी (दि. २८) आपली भूमिका मांडली. एकीकडे गोंडपिपरी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसी रद्द करण्यासाठी शेतकरी आंदोलने, मोर्चे आणि न्यायालयात लढा देत एकत्र आले आहेत तर दुसरीकडे एमआयडीसी समर्थनार्थ पदयात्रा काढण्याचा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप समितीने केला आहे.

करंजी येथील अधिग्रहित ३५ एकरवर आजतागायत उद्योग उभे राहिले नाही, असे असताना आजपर्यंत आम्ही यासाठी कधीच करंजीकरांचा मोर्चा बघितला नाही. मग आज तालुक्यात औद्योगीकरणाविरोधात वातावरण असताना निवडणुकीच्या तोंडावर ही नौटंकी कशासाठी ? असा प्रश्नही यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी विचारला. यावेळी या १२ गावातील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन समितीने केले आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील करंजी एमआयडीसी प्रकल्पासाठी परिसरातील १२ गावांमधील शेतजमिनी संपादित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र या गावांतील शेतकऱ्यांनी आपली सुपीक जमीन कोणत्याही परिस्थितीत देणार नसल्याची भूमिका घेतली आहे.शेती आपली मायबाप असून उदरनिर्वाहासाठीचा मोठा आधार आहे, असे सांगत आमचा औद्योगिक विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेण्यास विरोध असल्याचे स्पष्ट केले.

एमआयडीसीच्या समर्थनार्थ पदयात्रा काढणाऱ्यांनी या १२ गावांतील शेतकऱ्यांची भूमिका समजून घ्यावी. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या जमिनीबाबत निर्णय घेण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही पत्रकार परिषदेत करण्यात आले. शेतकरी आपल्या जमिनी वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरले असताना, काही लोकांकडून एमआयडीसीच्या समर्थनार्थ वातावरण निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न होत असल्याने शेतकरी एकता संघर्ष कृती समितीने नाराजी व्यक्त केली आहे.

करंजी एमआयडीसीसाठी शासनाने राखीव ठेवलेल्या जागेतच उद्योग उभारण्यात यावेत, याला आमची कोणतीही हरकत नाही. मात्र सुपीक शेती संपादित करून एमआयडीसी उभारण्यास आमचा ठाम विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका समितीने मांडली. औद्योगिक विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येऊ नये. विकास हवा ; मात्र तो शेतकऱ्यांच्या जमिनी आणि त्यांच्या भविष्याचा बळी घेऊन नको, असा संदेश पत्रकार परिषदेतून देण्यात आला. करंजी एमआयडीसीच्या प्रश्नावर शेतकरी एकता संघर्ष कृती समितीचा लढा पुढेही सुरू राहणार असल्याचे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी स्पष्ट करण्यात आले.

यावेळी शेतकरी एकता संघर्ष कृती समितीचे सचिव माधव लडके, औद्योगिक कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय वडस्कर, विपीन मोरे, देवराव मडावी, बंडू भसारकर, गणेश भोगेकर, गजानन लडके, सुनील रामगिरवार, विशाल मोरे, दीपक भोगेकर, दिलीप कुळमेथे, प्रफुल आलाम, रुपेश आत्राम, रवींद्र शेडमाके आदींची उपस्थिती होती.

*ज्याचे जळते _ त्यालाच कळते*

एमआयडीसीसाठी ज्यांची इंचभरही जागा गेली नाही किंवा जानारही नाही, अश्यांना त्याचे दुःख काय समजणार, केवळ पब्लिसिटीसाठी शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ कशाला?, असा प्रश्नही यावेळी उपस्थितांनी विचारला.

*शेतकऱ्यांनो सावध रहा*

गोंडपिपरी तालुक्यात औद्योगीकरण विरोधात शेतकरी एकत्र आले. यातून तीन शेतकरी परिषदा पार पडल्या. शेतकरी एकतेचा नारा बुलंद झाला, असे असताना मात्र औद्योगीकरणासाठी पोषक वातावरण निर्मितीचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सावध रहावे, असे आव्हाहनही यावेळी पत्रकार परिषदेतून करण्यात आले.

*शेतकरी विरोधकांपासून सतर्क रहा*

गोंडपिपरी तालुक्यात एमआयडीसीकरिता १२ गावातील दहा हजार एकर शेतजमीन जाण्याची भिती आहे. या ठिकाणी दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणारा प्रकल्प येत आहे. गोजोली व परिसरात दालमियाचा मोठा प्रकल्प तयारी करून आहे. याकरिता प्रशासनाने कंबर कसली आहे. तालुक्यात औद्योगिक वातावरणाला विरोध असतांना त्याला सकारात्मक करण्यासाठी शेतकरीविरोधी काही मंडळी सरसावली आहे. अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये