ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बनावट मद्याचा विळखा : अधिकृत बार-वाईन शॉपच्या आडून अवैध विक्रीचा संशय!

भंगारवाल्यांकडून रिकाम्या ब्रँडेड बाटल्यांची खरेदी : गोवा बनावट मद्याचे नाशिकपर्यंतचे कनेक्शन उघड झाल्याने खळबळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

               जिल्ह्यात बनावट आणि भेसळयुक्त मद्याच्या विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक बिअर बारमध्ये आर.एस. आणि आय.बी. यांसारख्या नामांकित ब्रँडच्या रिकाम्या मद्याच्या बाटल्या भंगार व्यावसायिकांकडून प्रत्येकी पाच रुपये दराने खरेदी केल्या जात असल्याची चर्चा असून, या प्रकारामागील नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, दि. २३ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या मद्य तस्करीचा पर्दाफाश करीत या प्रकरणाचे धागेदोरे थेट नाशिक जिल्ह्यापर्यंत असल्याचे उघड केले. नाशिक येथे बनावट विदेशी मद्यनिर्मितीच्या ठिकाणी छापा टाकून मोठी कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे जिल्ह्यातील मद्य विक्री व्यवस्थेतील संभाव्य गैरप्रकारांबाबत संशय अधिक गडद झाला आहे.

अधिकृत परवानाधारक बार आणि वाईन शॉपमध्येच बनावट मद्य विकले जात असल्याचा निष्कर्ष काढता येत नसला, तरी रिकाम्या ब्रँडेड बाटल्यांची खरेदी, त्यांचा संभाव्य गैरवापर आणि अधिकृत मद्यसाठ्याच्या आडून होणारे व्यवहार यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. रिकाम्या बाटल्यांचा वापर करून स्वस्त किंवा बनावट मद्य मूळ ब्रँडच्या नावाने विकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशा मद्यामध्ये मिथॅनॉलसारख्या विषारी रसायनांचा वापर झाल्यास अंधत्व, गंभीर विषबाधा अथवा मृत्यूही ओढवू शकतो. त्यामुळे मद्याच्या बाटल्यांचे सील, होलोग्राम, क्यूआर कोड, बॅच नंबर आणि एमआरपी तपासूनच खरेदी करावी.

भंगारातून बारपर्यंत पोहोचणाऱ्या रिकाम्या बाटल्यांच्या व्यवहारांची चौकशी होणार का? जिल्ह्यातील बार व वाईन शॉपमधील मद्यसाठ्याची तपासणी, खरेदी-विक्रीच्या नोंदींचे परीक्षण आणि संशयास्पद बाटल्यांच्या पुरवठा साखळीची चौकशी करण्याची मागणी होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित या गंभीर विषयाकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये