भद्रावतीच्या भाजी मंडईचे स्थलांतर आता नव्या इमारतीत : आमदार करण देवतळे यांची पाहणी
दोन कोटी रुपयांचा निधी इमारतीतील आवश्यक बदल व सुविधांसाठी वापरणार : व्यापारी संघटनेच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरातील भाजी मंडईच्या स्थलांतराचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने आमदार करण दादा देवतळे यांनी दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी व्यापारी संघटना व भाजी मंडईतील व्यापाऱ्यांच्या सदस्यांसमवेत लेंडारा तलावाच्या दिशेने असलेल्या प्रस्तावित भाजी मंडईच्या इमारतीची पाहणी केली.
यावेळी सध्याची भाजी मंडई प्रस्तावित इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित इमारतीमध्ये आवश्यक बदल व सुधारणा करून ती भाजी मंडईसाठी उपयोगात आणण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी उपलब्ध असलेला दोन कोटी रुपयांचा निधी इमारतीच्या आवश्यक कामांसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
भाजी मंडईच्या स्थलांतराचा विषय अनेक दिवसांपासून प्रलंबित असून, व्यापाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता व्यापारी संघटनेने या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. व्यापारी संघटनेच्या पुढाकारातून हा विषय आमदार करण देवतळे यांच्यासमोर मांडण्यात आला. त्यानंतर आमदारांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून व्यापाऱ्यांशी चर्चा केली.
या पाहणीप्रसंगी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पामपट्टीवार, उपाध्यक्ष प्रवीण महाजन, सचिव नितीन मस्जिदकर, शैलेन्द्र कोठारी, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, दिलीप उमरे, विजय भोयर, गोविंदा बिंजवे, दादाजी भट्ट, सचिन नाक्सिने, अनिल निंबालकर, निलेश बिंजवे, निलेश रोकडे यांच्यासह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.
भाजी मंडईच्या इमारतीत आवश्यक सुधारणा करून स्थलांतराची प्रक्रिया प्रत्यक्षात आल्यास व्यापाऱ्यांना अधिक नियोजनबद्ध जागा उपलब्ध होण्यासोबतच शहरातील भाजी मंडईचा प्रश्नही मार्गी लागण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दोन कोटी रुपयांच्या निधीतून होणारी कामे आणि भाजी मंडईचे प्रत्यक्ष स्थलांतर कधी होणार, याकडे व्यापारी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.



