ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागतिक बाल दिन विशेष _ २० नोव्हेंबर जागतिक बालदिन : मुलांमुलींत ऋतुराज बहरावा

जगात वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बालदिन होतो साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

जागतिक बालदिन- World Children’s Day दरवर्षी २० नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे बालकांच्या हक्कांचे रक्षण करणे, त्यांच्या गरजांकडे लक्ष देणे आणि एक समृद्ध, सुरक्षित भविष्य निर्माण करणे होय. सन १९५४ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस बालकांच्या आरोग्य, शिक्षण, संरक्षण आणि विकास यांसारख्या मूलभूत गरजांवर जागरूकता वाढवण्यासाठी सुरू केला. जागतिक बालदिनानिमित्त शाळा, समाजसेवी संस्था आणि विविध सामाजिक संघटना मुलांच्या कल्याणासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात, जसे की सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, चर्चासत्रे आणि बालहक्कांविषयी माहितीपट. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि समर्थ वातावरण देणे आवश्यक आहे. बालक हे समाजाचे भविष्य आहेत; त्यांच्या हक्कांचे रक्षण करून, त्यांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास एक सशक्त समाज निर्माण होऊ शकतो. जागतिक बालदिन आपल्याला मुलांचे आरोग्य, शिक्षण आणि त्यांच्या हक्कांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी एक संधी प्रदान करतो.

जागतिक बालदिन (World Children’s Day) दरवर्षी २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.

जागतिक बालदिनाचा इतिहास व महत्त्व :
सन १९५४ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ (UN) आणि युनिसेफ (UNICEF) यांनी २० नोव्हेंबर हा दिवस ”सर्वत्रिक बालदिन- Universal Children’s Day” म्हणून पाळण्याची शिफारस केली. दि. २० नोव्हेंबर १९५९ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ”बालहक्कांची सनद- Declaration of the Rights of the Child” मान्य केली आणि दि. २० नोव्हेंबर १९८९ रोजी ”बालहक्क करार- Convention on the Rights of the Child” संमत केला. जगभरातील मुलांचे अधिकार जपणे, त्यांचे शोषण थांबवणे, त्यांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षित वातावरण मिळवून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

*भारत आणि जागतिक बालदिन – १४ नोव्हेंबर विरुद्ध २० नोव्हेंबर :
भारतात बालदिन- भारतात जागतिक पातळीच्या ऐवजी दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. पंडित जवाहरलाल नेहरूजींचा जन्मदिवस हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजी यांच्या जन्मस्मरणार्थ साजरा केला जातो. त्यांना लहान मुलांविषयी अपार प्रेम होते, मुले त्यांना प्रेमाने ”चाचा नेहरू” म्हणत. सन १९६४ मध्ये त्यांच्या निधनानंतर हा दिवस भारतात बालदिन म्हणून ठरवण्यात आला.

विविध देशांतील बालदिन :
जगात वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बालदिन साजरा केला जातो. जसे चीन ४ एप्रिल, जपान ५ मे, अमेरिका जून महिन्याचा दुसरा रविवार, पाकिस्तान १ जुलै, ब्रीटन (युके) ३० ऑगस्ट, अनेक कम्युनिस्ट देश १ जून.

बालदिनाची उद्दिष्टे:
बालकांच्या गरजा व हक्क यांविषयी जाणीवजागृती करणे, बालकल्याणकारी योजना वाढीस लावणे, बालकांमध्ये सांप्रदायिक व सांस्कृतिक देवाणघेवाण करणे, बालकांमध्ये विविध पंथ वा धर्मांबाबत संहिष्णुता निर्माण करून सामंजस्याची भावना वाढीस लावणे, जगभरातील मुलामुलींमध्ये बंधुभाव वाढीस लावणे, बालकांचे बालपण अधिक समृद्ध बनवणे, बालकांमध्ये ‘’विश्वकुटुंब” संकल्पना वाढीस लावणे.

बालदिन वैशिष्ट्य:
बालदिनानिमित्त विभूतिपूजा टाळून बालकांच्या गरजा व हक्क यांबाबत राष्ट्रातील पालकांमध्ये जाणीवजागृती निर्माण केली जाते. पंडित नेहरूजी यांचा धीरोदात्तपणा, वीरवृत्ती, असामान्य चरित्र व चारित्र्य तसेच अथांग मानवता हे बालकांमध्ये संक्रमित करण्याचा प्रयत्न केला जातो. कविवर्य रवींद्रनाथ टागोरजी यांनी म्हटल्याप्रमाणे ‘’जवाहरलाल म्हणजे ऋतुराज’’. हा ‘‘ऋतुराज’’ मुलामुलींमध्ये खुलवून त्यांचे जीवन आनंदी बनविण्याचा प्रयत्न केला जातो. मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होण्यासाठी अशा दीपस्तंभाची गरज असते. ती भागविण्याचा येथे अल्पसा प्रयत्न सुरू आहे, परंतु आज शिक्षणपद्धतीकडे नेहरूजींच्या दृष्टीने पाहिले जात नाही. त्यामुळे नको त्या वयात नको ते गुन्हे बालकांकडून घडत आहेत. त्यांची मने ‘’कोडगी’’ बनल्यामुळे भावनिक बुद्धिमत्ता कमी झाली आहे, याची पालकांना जाणीव राहिलेली नाही. बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. याचे कारण आपण संस्काराला कमी पडत आहोत.

इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रमाण, प्रादेशिक भाषेतील शाळांमधील घटती विद्यार्थिसंख्या. व्यापारी दृष्टिकोनातून शाळा काढून संस्थाचालक संस्थानिक झाले आहेत. शिक्षकप्रशिक्षणाचा कणाच मोडला आहे. पूर्व माध्यमिक शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे आज भ्रष्टाचार वाढला आहे. त्यासाठी चांगल्या चारित्र्याचे शिक्षक, पालक, संस्थाचालक, राज्यकर्ते इत्यादींची गरज आहे. त्यांची निर्मिती बालशिक्षणातून केली पाहिजे. केवळ ‘”बालआनंद मेळावा, बालमहोत्सव, बालदिन” यांसारख्या दिवशी मनोरंजनात्मक कार्यक्रम साजरे न करता, त्यांतून मुलामुलींमध्ये कुटुंब, समाज, देश इत्यादींबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली पाहिजे आणि त्यांप्रती उचित कार्य करण्याची प्रेरणात्मक शिकवण दिली पाहिजे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये