ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कारमधून विदेशी मद्याची तस्करी : पोलिसांची धडक कारवाई

११ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त : दोन आरोपींना अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने धडक कारवाई करीत दोघांना ताब्यात घेतले. भद्रावती महामार्गावरील जमघाट हॉटेलसमोरील रस्त्यावर नाकाबंदी करून करण्यात आलेल्या या कारवाईत विदेशी मद्याचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली हुंदाई क्रेटा कार असा एकूण ११ लाख ३७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १६ नोव्हेंबर रोजी करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भद्रावती परिसरात गस्तीवर असताना विदेशी मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भद्रावती महामार्गावरील जमघाट हॉटेलसमोर नाकाबंदी केली. यावेळी संशयास्पदरीत्या येणारी हुंदाई क्रेटा कार अडवून तपासणी केली असता, वाहनात मोठ्या प्रमाणात रॉयल स्टॅग विदेशी मद्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत वाहनातील दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी जप्त केलेल्या मद्यसाठ्यात १८० मिलीच्या रॉयल स्टॅगच्या १९२ निपा, किंमत ४८ हजार रुपये, ९० मिलीच्या ४०० निपा, किंमत ५६ हजार रुपये, तसेच २००० मिलीच्या १२ बंपर, किंमत ३३ हजार ६०० रुपये, असा एकूण १ लाख ३७ हजार ६०० रुपयांचा विदेशी मद्यसाठा समाविष्ट आहे. याशिवाय मद्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एमएच ३१ ईएफ ३७०० क्रमांकाची अंदाजे १० लाख रुपये किमतीची हुंदाई क्रेटा कार जप्त करण्यात आली. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ११ लाख ३७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

दोघांविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा

या प्रकरणी विलास किसन रंगारी (वय ४५, रा. सुरक्षा नगर, भद्रावती) आणि मिलिंद गोरखनाथ रामटेके (वय ४८, रा. शिवाजीनगर, भद्रावती) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात अप. क्र. १०६९/२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई)(अ), ८३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पीएसआय सर्वेश बेलसरे, पोलीस हवालदार सुभाष गोहोकार, सचिन गुरनुले, रजनीकांत पुठ्ठावार, पोलीस शिपाई विठ्ठल काकडे, प्रफुल्ल पुप्पलवार, प्रतीक हेमके आणि वाहनचालक दिनेश अराडे यांच्या पथकाने केली. उपविभाग वरोरा पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या संयुक्त सहभागातून ही कारवाई यशस्वी करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये