जि. प. उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत करिअर व कला-कौशल्य मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
माजी विद्यार्थी छगन निवलकर (कर सहाय्यक, MPSC) यांनी केले विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत आणि ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लखमापूर येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘कला, कौशल्य व करिअर मार्गदर्शन कार्यशाळा’ उत्साहात पार पडली. या कार्यशाळेसाठी शाळेचे माजी विद्यार्थी व नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) ‘कर सहाय्यक’ (Tax Assistant) पदी निवड झालेले श्री. छगन निवलकर यांना मुख्य मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
आपल्याच शाळेतून शिकून प्रशासकीय सेवेत यशस्वी पदावर पोहोचलेल्या माजी विद्यार्थ्याला आपल्यासमोर पाहून विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. श्री. निवलकर यांनी विद्यार्थ्यांना शालेय वयापासूनच नियमित अभ्यास, वाचन संस्कृती, कला-कौशल्यांचा विकास आणि स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी कशी करावी, याबाबत अत्यंत सहज व प्रेरणादायी शैलीत सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील मुलेही चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर उच्च पदांवर झेप घेऊ शकतात, हा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्सुकतेने आणि आपुलकीने हे विचार ऐकून घेतले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक आदरणीय श्री. विनोद क्षीरसागर सर होते. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. विशेष म्हणजे, ज्या शाळेत आणि ज्या शिक्षकांकडून शालेय शिक्षण घेतले, त्याच शाळेत मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहण्याचा दुग्धशर्करा योग श्री. निवलकर यांच्यासाठी जुळून आला. याप्रसंगी शाळेच्या निवड कर यांना शिकवलेल्या कुमारी मंदा उरकुडे मॅडम तसेच उपक्रमशील विज्ञान विषय शिक्षिका सौ. शोभना खैरे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक श्री. विनायक फुकट सर, श्री. चव्हाण सर तसेच श्री. करतारसिंग अलावत सर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अखेरीस शाळेचे माजी विद्यार्थी तथा नवोदित अधिकारी श्री. छगन निवलकर यांचा शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शिक्षकांनी केले. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.



