पदवीधर मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधा, प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रेरित करा – आ. किशोर जोरगेवार.
भाजप चंद्रपूर महानगर नागपूर विभाग पदवीधर निवडणूक नियोजन बैठकीत..

चांदा ब्लास्ट
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या चंद्रपूर महानगरच्या वतीने चंद्रपूर महानगर जनसंपर्क कार्यालयात निवडणूक नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे चंद्रपूर महानगर पदवीधर निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पदवीधर मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे, त्यांना मतदान प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्याचे आणि मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्याचे आवाहण कार्यकर्त्यांना केले.
या बैठकिला जेष्ठ नेते विजय राऊत, ओबीसी नेते डॉ अशोक जिवतोडे, जेष्ठ नेते प्रकाश देवतळे, राज्य कार्यकरणी परिषद सदस्य तुषार सोम, महामंत्री रविंद्र गुरनुले, नामदेव डाहुले, सविता दंढारे, महिला मोर्चा प्रमुख वंदना हातगावकर, विधानसभा समन्वयक प्रवीण गिलबिले, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, भाजपचे चंद्रपूर महानगर पदवीधर नोंदणी प्रमुख सुमित बेले मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, स्वप्नील डुकरे, सुभाष आदमने, अॅड सारिका संदुरकर, विनोद खेवले. अनु. जाती अध्यक्षा विमल काटकर, नगरसेवक भालचंद्र दानव, नगरसेविका सविता कांबळे, पुष्पा उराडे, सरला कुळसंगे, अनुजा तायडे, आशा देशमुख, आदिंची उपस्थिती होती.
निवडणुकीतील यशासाठी केवळ नियोजन करून चालणार नाही, तर प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने प्रत्यक्ष मैदानात उतरून मतदारांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही सुशिक्षित मतदारांशी थेट संवाद साधण्याची आणि त्यांच्यापर्यंत पक्षाची भूमिका व विचार पोहोचवण्याची महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे मतदारांशी नियमित संपर्क ठेवून त्यांच्या प्रश्नांची माहिती घ्यावी, त्यांना निवडणुकीचे महत्त्व समजावून सांगावे आणि मतदानाबाबत जागरूक करावे, असे ते यावेळी म्हणाले.
प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत पोहोचणे हे कार्यकर्त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला. मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र आणि मतदानाची पद्धत याबाबत मतदारांना योग्य माहिती द्यावी. विशेषतः पदवीधर मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेबाबत काही मतदारांच्या मनात संभ्रम असू शकतो. तो दूर करून त्यांना नियमांनुसार मतदान कसे करायचे, याची स्पष्ट माहिती द्यावी. मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती उपलब्ध करून देत, त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे,
निवडणूक नियोजनात बूथनिहाय तयारीला विशेष महत्त्व असून, प्रत्येक मतदान केंद्राच्या कार्यक्षेत्रातील मतदारांशी संपर्काची जबाबदारी निश्चित करावी. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील पदवीधर मतदारांची माहिती व्यवस्थित संकलित करून त्यांच्याशी सातत्याने संवाद ठेवावा. केवळ निवडणुकीच्या काळातच नव्हे, तर नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणारी संघटनात्मक कार्यपद्धती विकसित करणेही आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने चंद्रपूर महानगरातील नियोजन, मतदार संपर्क आणि संघटनात्मक तयारीबाबत चर्चा करण्यात आली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करून निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.



