आचार्य पदवी संशोधनाकरिता पात्रता पेट परीक्षा घ्या
गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेची कुलगुरूंकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर संघटनेच्या वतीने आचार्य पदवीकरता पात्रता परीक्षा म्हणून पेट परीक्षा घेण्यासंबंधी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय गोरे, सचिव डॉ.विवेक गोर्लावार,उपाध्यक्ष डॉ. विजय वाढई, संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. रामदास कामडी डॉ. अक्षय धोटे डॉ.राहुल सावलीकर इत्यादी संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कुलगुरू महोदयांनी पेट परीक्षेचे परिपत्रक तात्काळ निर्गमित करण्यासंबंधी आश्वासित केले आहे.
गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेच्या वतीने याआधी आचार्य पदवी संशोधनाकरिता पात्रता पेट (PET) परिक्षा घेण्याबाबत अनेक निवेदन दिलेले आहे. मात्र त्याबाबत प्रशासनाने कोणती ही ठोस कार्यवाही घेतल्याचे दिसून येत नाही करिता पुन्हा संबंधित समस्या सोडवणुकी करिता संघटनेच्या वतीने निवेदन देऊन पेट परीक्षा संदर्भातली भूमिका कुलगुरू महोदयांना समजून सांगण्यात आली.
आचार्य पदवी करिता प्रवेश पात्रता परिक्षा म्हणून मुंबई विद्यापीठ, मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, रा.तु.म. नागपूर विद्यापीठ, नागपूर, संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ अमरावती अशा अनेक नामांकित विद्यापीठे आचार्य पदवी करिता पात्रता परिक्षा म्हणून पेट (PET )परिक्षा घेवुन विद्यार्थ्यांना संशोधन करण्याची संधी उपलब्ध करुन देत आहे . मात्र गोंडवाना विद्यापीठाने सप्टेंबर-2023 पासून पेट (PET) पात्रता परिक्षा घेणे बंद केलेली असुन ग्रामीण-आदिवासी बहुल भागातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या संशोधनाची दारे बंद झाली असल्याचे संघटनेच्या वतीने कुलगुरू महोदयांना सांगण्यात आले.
विशेष म्हणजे याआधी गोंडवाना विद्यापीठाच्या विद्या परिषद,अधिसभा व व्यवस्थापन परिषद सभेमध्ये पेट (PET )परिक्षा घेण्याविषयी सविस्तर चर्चा होऊन पेट ( PET) परिक्षा घेण्याविषयी मान्यता दिलेली आहे. परंतु अनेक महिने लोटूनही आपले विद्यापीठाने पेट PET परिक्षा घेण्याविषयी परिपत्रक निर्गमित केलेले नाही. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठ PET परिक्षा घेण्याविषयी उदासीन असुन ग्रामीण-आदिवासी बहुल भागातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना संशोधनापासुन वंचीत ठेवत आहे अशी धारणा समाजात होत आहे. त्यामुळे संवैधानिक मार्गाने आंदोलन करुन न्याय मागितल्याशिवाय पर्याय राहणार नाही. अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
करीता आचार्य पदवी करिता प्रवेश पात्र परिक्षा म्हणून पेट (PET) परिक्षा घेण्यासाठी तातडीने कार्यवाही घेवुन त्याबाबतचे परिपत्रक लवकरात लवकर निर्गमित करुन विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी . अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.



