ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना दुष्काळी पॅकेज द्या!

मच्छिंद्र मच्छुआँ सहकारी संस्थेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        चंद्रपूर जिल्ह्यात यंदा अत्यल्प पावसामुळे तलाव व जलाशयांतील पाणीसाठा कमी झाल्याने मत्स्यव्यवसायावर संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचा दुष्काळग्रस्त संस्थांमध्ये समावेश करून त्यांना विशेष आर्थिक मदत व दुष्काळी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी मच्छिंद्र मच्छुआँ सहकारी संस्था मर्यादित, भद्रावतीचे अध्यक्ष दिलीप किसनराव मांढरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्ह्यातील अनेक मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या माध्यमातून हजारो सभासद व मासेमार कुटुंबांना रोजगार आणि उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होते. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तलाव, जलाशय आणि अन्य जलस्रोतांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे मत्स्यपालनासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण झाली नसून, या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

दरवर्षी जून-जुलै महिन्यात तलावांमध्ये मत्स्यबीज सोडले जाते. यंदाही अनेक संस्थांनी मत्स्यबीज खरेदी करून तलावांमध्ये सोडले आहे. मात्र, पाण्याची पातळी कमी असल्याने मत्स्यबीज व मत्स्यसाठ्याचे नुकसान होण्याची भीती असून, संस्थांनी केलेला खर्च वसूल होणेही कठीण झाले आहे.

या परिस्थितीत शासनाने तातडीने हस्तक्षेप करून मत्स्यबीज व मत्स्यसाठ्याच्या नुकसानीचे सर्वेक्षण करावे, नुकसानभरपाई मंजूर करावी तसेच संस्थांच्या सभासदांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आणि सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), चंद्रपूर यांना देण्यात आल्या आहेत. शासनाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था व मासेमार कुटुंबांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये