ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या वीज समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वरोरा महावितरण कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन

कृषीपंपांसाठी २४ तास अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करा : सौरपंपाची सक्ती नको पारंपरिक वीज द्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ तालुक्यातील धानोली परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी नियमित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा, तसेच सौरपंपाची सक्ती न करता पारंपरिक वीज जोडणी उपलब्ध करून द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) वरोरा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दोन स्वतंत्र निवेदने सादर केली.

        सध्या परिसरातील कृषीपंपांसाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत केवळ सात तास वीजपुरवठा उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिकांना आवश्यकतेनुसार नियमित पाणी देता येत नसल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कृषीपंपांसाठी २४ तास नियमित, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाची वीज आणि इतर तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याची मागणीही करण्यात आली.

        दरम्यान, परिसरातील अनेक शेतकरी शेतीसाठी कृषीपंपाची वीज जोडणी घेण्यास इच्छुक आहेत. मात्र कृषीपंपासाठी सौरपंप घेण्याची सक्ती केली जात असल्याने आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्चाचा भार सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतीच्या गरजेनुसार पारंपरिक विद्युत जोडणी अधिक सोयीची व व्यवहार्य असल्याने, ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज जोडणी हवी आहे, त्यांना नियमानुसार महावितरणची कृषी वीज जोडणी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

     तसेच प्रलंबित कृषीपंप वीज जोडणी अर्जांचा तातडीने निपटारा करून पात्र शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून महावितरणने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा व तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.

        यावेळी वरोरा कार्यकारी अभियंत्यांना नवघरे यांना निवेदन देते वेळी प्रशांत काळे, नरेंद्र जिवतोडे, प्रदीप ममाकुलर, अंबर जिवतोडे, सुरज खंगार, बालाजी रोडे, हेमंत धानोरकर, गोकुल रोडे, प्रकाश चौधरी, विक विष्णुदास मत्ते, प्रफुल डोंगरी, मंगेश रोडे, बालाजी खापणे, राजुभाऊ रोडे, श्रीकृष्ण रोडे व पिरली, धानोली, मांगली, विसापूर, वाघेडा, जेना,कांसा, पाणवडाळा, डोंगरगाव, भटाळी, फुटाळा, पावणा, पेवरा, नांद्रा या गावातील शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये