ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर रस्त्याच्या दुरवस्थेने घेतला एक वर्षीय बालकाचा बळी!

अवजड हायवाची दुचाकीला धडक ; बालकाचा मृत्यू, वडील व भाऊ गंभीर जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         भद्रावती शहरातील मस्जिद परिसर ते हनुमान नगर या अरुंद आणि वर्दळीच्या रस्त्याची दुरवस्था अखेर एका निष्पाप बालकाच्या जीवावर बेतली आहे.

गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फुकट नगर परिसरातील मटन मार्केटजवळ गिट्टीने भरलेल्या अवजड हायवाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अवघ्या एक वर्षाच्या विधान पॉल या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्याचे वडील रणवीर पॉल आणि भाऊ बॉबी पॉल हे जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर पॉल हे आपल्या दोन्ही मुलांसह दुचाकीने फुकट नगर येथून बाजाराच्या दिशेने जात होते. मटन मार्केटजवळ गिट्टीने भरलेल्या हायवाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि काही क्षणांतच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

मात्र हा केवळ एक अपघात म्हणून दुर्लक्षित करण्याचा विषय नाही.

मस्जिद परिसर ते हनुमान नगर या रस्त्याची दुरवस्था, अरुंद मार्ग आणि त्यावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक हा अनेक वर्षांपासूनचा गंभीर प्रश्न आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या, निवेदने दिली, आंदोलने केली. ‘या रस्त्यावर कधीतरी मोठी दुर्घटना होईल’ अशी भीतीही व्यक्त करण्यात आली.

पण प्रशासनाने त्याकडे किती गांभीर्याने पाहिले?

आज त्या प्रश्नाचे उत्तर एका एक वर्षाच्या निष्पाप बालकाच्या मृत्यूने समोर आले आहे.

अरुंद आणि वर्दळीच्या रस्त्यावर अवजड वाहने धावत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? नागरिकांच्या तक्रारी आणि मागण्यांनंतरही ठोस उपाययोजना का करण्यात आली नाही? रस्त्याची पाहणी आणि वाहतूक नियमन वेळेत का झाले नाही? असे अनेक संतप्त सवाल आता भद्रावतीकरांकडून उपस्थित केले जात आहेत.

अपघाताची माहिती मिळताच भद्रावती पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हायवा ताब्यात घेतला असून चालकाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर नागरिकांचा संताप आणखी तीव्र झाला आहे. आता केवळ पंचनामा, तपास आणि कारवाई पुरेशी नाही; तर या मार्गावरील अवजड वाहतुकीवर तातडीने नियंत्रण आणि रस्त्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

तसेच, निष्काळजीपणा किंवा कर्तव्यातील दुर्लक्ष सिद्ध झाल्यास संबंधित जबाबदार अधिकारी आणि यंत्रणेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

एका वर्षाच्या चिमुकल्याचा जीव गेल्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का?

की आणखी एखाद्या निष्पाप जीवाच्या बळीची वाट पाहणार?

या प्रश्नाचे उत्तर आता प्रशासनाला द्यावे लागणार आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये