गीट्टीने भरलेल्या हायवाची दुचारीला धडक : एकाला दुखापत तर दुसरा गंभीर जखमी
भद्रावती शहरातील घटना : नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील मस्जिद परिसर ते हनुमान नगर या रस्त्याची दुरवस्था आणि या अरुंद, वर्दळीच्या मार्गावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक अखेर अपघाताला कारणीभूत ठरली. गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गिट्टीने भरलेल्या हायवाने फुकट नगर परिसरात एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील वडील व एका लहान मुलाला दुखापत झाली असून, मोठा मुलगा गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मस्जिद ते हनुमान नगर या मार्गाची समस्या नगर परिषद स्थापनेपासूनच कायम असल्याची नागरिकांची तक्रार आहे. रस्ता अरुंद असतानाच याच मार्गावरून भर बाजारातून मोठमोठी अवजड वाहने दामटत जात असल्याने नागरिकांच्या जीवित सुरक्षेचा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता.
या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत अनेक सुजाण नागरिक तसेच विविध राजकीय पक्षांकडून वेळोवेळी आंदोलने, निवेदने आणि मागण्या करण्यात आल्या. मात्र, समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही. ‘या मार्गावर कधी तरी मोठा अपघात होईल’ अशी व्यक्त होणारी भीती अखेर प्रत्यक्षात आली, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
जबाबदारी कोणाची?
अरुंद रस्ता, बाजारपेठेची वर्दळ आणि त्यातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक या तिन्ही बाबी धोकादायक असताना प्रशासनाने ठोस उपाययोजना का केल्या नाहीत, असा सवाल आता उपस्थित होत आहे. रस्त्याची व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण याबाबत नगर परिषद प्रशासन तसेच संबंधित वाहतूक यंत्रणेची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रशासकीय काळातच आवश्यक ती कार्यवाही करून अवजड वाहनांना पर्यायी मार्ग देणे, वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे किंवा रस्त्याची आवश्यक सुधारणा करणे शक्य होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
आजच्या अपघातामुळे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भविष्यात आणखी एखादा गंभीर अपघात होण्याची वाट न पाहता नगर परिषद व वाहतूक पोलिसांनी तातडीने संयुक्त पाहणी करून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध, वाहतूक नियंत्रण आणि रस्त्याच्या सुधारणेबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या व्यवस्थेची जबाबदारी निश्चित होणार का? हा प्रश्न आता भद्रावतीकरांसमोर उभा ठाकला आहे.



