प्रधानमंत्री जीवन ज्योती व सुरक्षा विमा योजनेतून सामाजिक सुरक्षा
लोकसंवाद कार्यक्रमातून रत्नापूर येथे योजनेची जनजागृती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सेवा संकल्प अभियानांतर्गत माहिती व जनसंपर्कचा उपक्रम ; डिजिटल व्यवहार करतांना खबरदारी घेण्याचे आवाहन
वर्धा : केंद्र शासनाच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून नागरिकांना विम्याचे सामाजिक कवच उपलब्ध होते. या योजनांबाबत देवळी तालुक्यातील रत्नापूर येथे गणेशोत्सवात जनजागृती करण्यात आली.
लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी माहिती व जनसंपर्क विभाग, जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने गणेश मंडळांच्या ठिकाणी विविध योजनांची लोकसंवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. देवळी तालुक्यात रत्नापूर येथील बालवीर गणेश मंडळ येथे आयोजित लोकसंवादात प्रधानमंत्री जीवन ज्योती व सुरक्षा विमा योजनेची माहिती देण्यात आली.
केंद्र सरकारच्या आर्थिक साक्षरता विभागाच्या तालुका समन्वयक लक्ष्मी काकडे यांनी विमा योजनांच्या माध्यमातून नागरिकांना सामाजिक सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पात्र नागरिकांनी संबंधित योजनांची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह त्यांचा लाभ घ्यावा. कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विमा योजनांचे महत्त्व लक्षात घेऊन नागरिकांनी अशा योजनांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
डिजिटल व्यवहारांचा वापर दिवसेंदिवस वाढत असून त्यासोबतच ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना विशेष सावधानता बाळगावी. अनोळखी व्यक्तींना ओटीपी, पासवर्ड, एटीएम कार्डची माहिती, पिन क्रमांक किंवा बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती देऊ नये. तसेच मोबाईलवर प्राप्त होणाऱ्या संशयास्पद संदेश, लिंक अथवा फोन कॉलला प्रतिसाद देताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन तालुका समन्वयक जोत्सना वरघट यांनी केले.
डिजिटल फ्रॉडपासून बचावासाठी घ्यावयाची खबरदारी, डिजिटल व्यवहार करताना बँक किंवा कोणतीही अधिकृत संस्था ओटीपी, यूपीआय पिन, पासवर्ड यांसारखी गोपनीय माहिती फोनवरून मागत नाही. त्यामुळे अशा प्रकारची माहिती कोणालाही देऊ नये. अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंकवर क्लिक करणे, मोबाईलवर आलेले संशयास्पद ॲप डाउनलोड करणे किंवा बँक खात्याची माहिती शेअर करणे टाळावे, असे त्यांनी सांगितले.
लोकसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या सेवांची माहिती सोप्या पद्धतीने देण्यात आली. नागरिकांनीही योजनांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाचे दिलीप बोंडसे, पंढरीनाथ लुटे, बालवीर गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.


