येरमी येसापूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात
ध्वजारोहणासह मतदार जनजागृती; शाळेच्या भौतिक सुविधांबाबतही चर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, येरमी येसापूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गुरुवारी (दि.१७) सकाळी ८.३० वाजता शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रामराव पेटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी येरमी येसापूर ग्रामपंचायतीचे सरपंच जंगूजी कोटनाके, पेसा अध्यक्ष हनुमंतू कुमरे, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भीमराव कुमरे, उपसरपंच भीमराव मेश्राम, पेसा मोबिलायझर अनिता धुर्वे, सामाजिक कार्यकर्ते अनिल आडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विष्णू मुसने, इसरू मेश्राम तसेच अंगणवाडी सेविका शिवकला येसांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लिंगोराव सोयाम, सहशिक्षक पियुष जावळे, शिक्षिका मनीषा कुमरे तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुनील नगराळे उपस्थित होते.
*मतदार नोंदणीबाबत जनजागृती*
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून ‘सेवा संकल्प’ अंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रमही घेण्यात आला. पात्र नागरिकांनी मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदवून घ्यावे आणि मतदार म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी मतदार नोंदणीचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.
दरम्यान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक व भौतिक सुविधांबाबतही चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित स्तरावर पाठपुरावा व सहकार्य करण्याबाबत उपस्थितांनी भूमिका मांडली.
कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध समित्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रभक्ती, लोकशाही जनजागृती आणि सामाजिक सहभागाचा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.



