डॉ. स्वामिनी थेरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
सामाजिक बांधिलकीतून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- सामाजिक बांधिलकी जपत लोणी येथील प्रयोगशील शेतकरी कुटुंबातील कन्या तथा एमबीबीएस डॉ. स्वामिनी बंडू थेरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लोणी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. स्वतःच्या यशाचा आनंद ग्रामीण विद्यार्थ्यांसोबत वाटून घेत डॉ. थेरे यांनी सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण केला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात आणि आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले.
लोणी गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या कुटुंबातून पुढे येत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान मिळविलेल्या डॉ. स्वामिनी थेरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. शिक्षण, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही विविध क्षेत्रांत मोठे यश संपादन करू शकतात, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेहनत, जिद्द, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात मोठी भरारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही सांगण्यात आले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक परचाके, अनुलोम भाग जनसेवक राजुरा सतीश मुसळे, सहाय्यक शिक्षक बोरकर, रविंद्र राठोड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश तोडासे, उपाध्यक्ष आशिष आदे, जगदीश वाघाडे, माधुरी मुसळे, अंगणवाडी सेविका मंदा शिंदे, अर्चना काकडे, दीक्षा चिट्टलवार, ममता इटकलवार, सुरेखा मोहुर्ले यांच्यासह पालक, विद्यार्थी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



